भुसावळातील दे.ना.भोळे महाविद्यालयाच्या आरुषी सावकारेला वुशू स्पर्धेत सुवर्णपदक
भुसावळ (शुक्रवार, 18 सप्टेंबर 2026) : दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयातील विद्यार्थिनी आरुषी नयनकुमार सावकारेने शालेय जिल्हास्तरीय वुशू स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले. जळगाव जिल्हा क्रीडा संकुलात गुरुवार, 17 सप्टेंबर 2026 रोजी शालेय जिल्हास्तरीय वुशू स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत 19 वर्षांखालील 49 किलो वजन गटात आरुषी सावकारेने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रतिस्पर्ध्यांवर मात केली आणि सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.
खेळाडूची विभागीय स्पर्धेसाठी निवड
आरुषीच्या या यशामागे तिचा नियमित सराव, शिस्तबद्ध प्रशिक्षण आणि मेहनत यांचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. आरुषीने मिळविलेल्या या यशामुळे तिची आगामी विभागीय वुशू स्पर्धेसाठी नंदुरबार येथे निवड झाली आहे.



आरुषीच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजू फालक, शारीरिक शिक्षण व क्रीडा विभागप्रमुख प्रा.डॉ.संजय चौधरी, प्रा.एस.डी.चौधरी, प्रा.डॉ.जगदीश चव्हाण, प्रा.डॉ.अनिल सावळे, प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनींनी तिचे अभिनंदन करून विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. जिल्हास्तरीय सुवर्णपदकानंतर आता नंदुरबार येथील विभागीय स्पर्धेतही आरुषीने उत्तम कामगिरी करून महाविद्यालयाचे व भुसावळचे नाव उज्ज्वल करावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. आरुषीला प्रा.डॉ.संजय चौधरी व माजी खेळाडू प्रशिक्षक सुमेध भीमज्योत शेजवळ यांनी मार्गदर्शन केले.
