यावल वनहद्दीत बांबूची बेकायदेशीर वाहतूक : बोलेरो पिकअपसह तीन लाख 34 हजारांचा मुद्देमाल जप्त
यावल (शुक्रवार, 18 सप्टेंबर 2026) : हरिपुरा राऊंडच्या गस्ती पथकाने जामुनझिरा ते कोरपावली रस्त्यावर छापा टाकून बांबूची बेकायदेशीर वाहतूक करणारी बोलेरो पिकअप जप्त करीत वाहनासह तीन लाख 34 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईने अवैधरित्या वाहतूक करणार्यांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे.
गस्तीदरम्यान पथकाची कारवाई
शुक्रवार, 18 सप्टेंबर रोजी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास वन विभागाचे हरिपुरा राऊंड स्टाफ जामुनझिरा ते कोरपावली रस्त्याने नेहमीप्रमाणे गस्त घालत असताना संशयित बोलेरो पिकअप (क्रमांक एम.एच.06 बी.जी.1259) भरधाव वेगाने येताना दिसून आली. वन कर्मचार्यांनी शंका आल्याने चौकशीसाठी वाहन थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र वन कर्मचार्यांना पाहताच वाहन चालक घाबरला आणि गाडी रस्त्यावरच सोडून अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पसार झाला. त्यानंतर वन कर्मचार्यांनी पंचांसमक्ष सदर वाहनाची कसून तपासणी केली असता, त्यात विनापरवाना व अवैधपणे वाहून नेले जाणारे 1800 नग बांबू आढळून आले. जप्त केलेल्या बांबूची एकूण किंमत सुमारे 34 हजार तर वाहनाची किंमत तीन लाख रुपये आहे. संपूर्ण मुद्देमाल पावतीद्वारे मुख्य विक्री केंद्र, यावल येथे सुरक्षित जमा करण्यात आला..
या प्रकरणी वनरक्षक हरिपुरा यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हरिपुराचे प्रभारी वनपाल एस.बी.इंडे करीत आहेत.



यांनी केली कारवाई
ही कारवाई यावल वन विभाग जळगावचे उप वनसंरक्षक सौरिष सहाय, यावल प्रा.व कॅम्पाचे सहाय्यक वनसंरक्षक एस.ए.पाटील, यावल पश्चिमचे वनपरिक्षेत्र अधिकारी पी.डी.जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल एस.बी.इंडे, वनरक्षक एस.पी.भालेराव, वनरक्षक एस.एस.भोंगरे, वनरक्षक एस.बी.पाटणे, योगेश मुंडे, चेतन शेलार आदींच्या पथकाने केली.
