मुक्ताईनगरात सेवानिवृत्त बीएसएफ कर्मचार्याकडे अडीच लाखांची धाडसी घरफोडी
मुक्ताईनगर (शनिवार, 19 सप्टेंबर 2026) : मुक्ताईनगर शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मागील भागातील बंद घराचे कुलूप व कडीकोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने व रोकड मिळून दोन लाख 56 हजार 950 रुपये किंमतीचा ऐवज लांबवला. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात चोरट्यांविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
बंद घराला टार्गेट
तक्रारदार रामधन केशव सूर्यवंशी (61, रा.कृषी उत्पन्न बाजार समितीमागे, मुक्ताईनगर) हे सेवानिवृत्त बीएसएफ कर्मचारी आहेत. 8 सप्टेंबर 2026 रोजी दुपारी 2 वाजेपासून 16 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजेपर्यंतच्या कालावधीत सूर्यवंशी यांचे घर बंद असल्याची संधी चोरट्यांनी साधत घराचे कुलूप व कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील कपाटात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड चोरून नेली.

चोरीस गेलेल्या ऐवजामध्ये सोन्याच्या अंगठ्या, बदामी आकाराच्या अंगठ्या, मंगळसूत्र, सोन्याचे कारले, सोन्याचे गहू मणी, सोन्याची चैन, पिवळ्या रंगाचे लॉकेट तसेच चांदीची पैंजण व जोडवे व 20 हजारांच्या रोकडचा समावेश आहे. तपास पोलीस निरीक्षक आशिषकुमार अडसुळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.निरीक्षक जयेश पाटील करीत आहेत.



