लालबागच्या दर्शनासाठी गेलेल्या जळगावातील तरुणाचा हृदयविकाराने मृत्यू
जळगाव (शनिवार, 19 सप्टेंबर 2026) : मुंबई येथे लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या जळगावातील तरुणाचा हृदयविकाराने मृत्यू झाला. जयदीप मेघराज नेमाडे (25, जळगाव) असे मृताचे नाव आहे. ही धक्कादायक घटना 17 सप्टेंबर रोजी रात्री 11.40 वाजता घडली.
जयदीप हा जळगावमधील नेमाडे ट्रान्सपोर्टचे संचालक मेघराज सुभाष नेमाडे (रा. जीवनमोती सोसायटी, शिरसोली रोड) यांचा एकुलता एक मुलगा होता. मेकॅनिकल इंजिनिअरिंग व एमबीएनंतर तो पुण्यात नोकरी करत होता. दरवर्षीप्रमाणे तो मित्रांसोबत लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मुंबईला गेला.

17 सप्टेंबर रोजी रात्री दर्शन रांगेत असताना त्याला अस्वस्थ वाटू लागले व गुदमरण्याचा त्रास सुरू झाला त्यामुळे तो मित्रांना सांगून रांगेतून बाहेर पडला. प्रकृती खालावल्याचे लक्षात येताच पोलिसांनी त्याला तातडीने मदत कक्षात नेऊन नंतर रुग्णवाहिकेने रुग्णालयात हलवले मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
जयदीपच्या आईचे 12 वर्षांपूर्वीच निधन झाले असून, या घटनेने नेमाडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. शवविच्छेदनानंतर मृतदेह जळगाव येथे रवाना करण्यात आल्यानंतर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.



