वीज सुरक्षेसह बचतीचे धडे ; 400 विद्यार्थ्यांचे प्रबोधन

महावितरणच्या मार्गदर्शनातून सौर ऊर्जेसह विविध योजनांची माहिती


थोरगव्हाण, ता.रावेर (रविवार, 20 सप्टेंबर 2026) : डी.एस.देशमुख माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात ‘देशमुख राजा 2026’ गणेशोत्सवानिमित्त महावितरणच्या वतीने वीज सुरक्षा, बचत आणि ऊर्जा संवर्धनाबाबत जनजागृती करण्यात आली. उपविभागीय अभियंता डी.आर.कोल्हे यांनी मार्गदर्शन केले. परिसरातील 11 गावांतील सुमारे 400 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

वीज सुरक्षेबाबत विद्यार्थ्यांना टीप्स
तुटलेल्या वीज तारांना स्पर्श न करणे, विद्युत खांबांवर न चढणे, मुलांना वीज वाहिन्यांपासून दूर ठेवणे, अनधिकृत जोडण्या टाळणे तसेच शॉर्टसर्किटच्या प्रसंगी मुख्य वीजपुरवठा बंद करण्याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. अधिकृत वीजतज्ज्ञांकडूनच दुरुस्ती करून घेण्याचे आवाहनही करण्यात आले. अनावश्यक उपकरणे बंद ठेवणे, स्टँडबाय मोड टाळणे, एलईडी दिव्यांचा वापर करणे आणि विजेचा काटकसरीने वापर करण्याचे महत्त्व स्पष्ट करण्यात आले. ‘पीएम सूर्यघर मुफ्त वीज योजना’, ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’, ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0’ यांसह रूफटॉप सोलर योजनांची माहिती देण्यात आली. इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग सुविधांचीही माहिती देण्यात आली. वीजपुरवठा खंडित झाल्यास 1800-212-3435, 1800-233-3435, 1912, 19120 या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.

यांची होती उपस्थिती
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष उमाकांत वसंत बाऊस्कर, संचालक नंदकुमार एकनाथराव चौधरी, चंद्रकांत सुराजी पाटील, रवींद्र काशिनाथ चौधरी, मधुकर वसंत कोल्हे यांच्यासह प्रमुख पाहुणे उपस्थित होते. मुख्याध्यापक डी.के.पाटील यांनी उपविभागीय अभियंता आर.डी.कोल्हे यांच्यासह मान्यवरांचे स्वागत केले. ज्येष्ठ शिक्षक वाय.जे.बकुरकुरे यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

सहाय्यक अभियंता बाविस्कर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांच्या मार्गदर्शनाने हा प्रबोधन कार्यक्रम विद्यालयात घेण्याची प्रेरणा मिळाली.

सूत्रसंचालन वाङ्मय समितीचे प्रमुख एस.बी.सपकाळे यांनी तर आभार एम.के.पाटील यांनी मानले. समिती सदस्या जयश्री प्रवीण चौधरी यांनी सहकार्य केले. सुरक्षित वीज वापर, विजेची बचत आणि सौर ऊर्जेचा स्वीकार हा संदेश विद्यार्थ्यांच्या माध्यमातून घराघरांत पोहोचविण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !