प्रवाशांच्या तक्रारींची दखल : भुसावळसह अकोला, खंडव्यातील जादा दर आकारणी करणार्‍या सहा केटरींग युनिटला ‘टाळे’

जादा दर आकारणीसह अनियमिततेची 23 प्रकरणांवर मध्य रेल्वेकडून लागलीच दखल


भुसावळ (सोमवार, 21 सप्टेंबर 2026) : प्रवाशांना दर्जेदार, स्वच्छतापूर्ण आणि निर्धारित दरांनुसार केटरिंग सेवा उपलब्ध करून देण्यासाठी मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने केटरिंग युनिट्सविरोधात कडक कारवाई केली आहे. ‘रेल मदत’द्वारे प्राप्त तक्रारी तसेच विविध ठिकाणी करण्यात आलेल्या तपासण्यांमध्ये आढळलेल्या अनियमिततांची तत्काळ दखल घेत विभागाने नियमानुसार दंडाची वसुली केली असून, गंभीर त्रुटी आढळलेल्या सहा केटरिंग युनिट्सना तात्पुरते कुलूप लावण्यात आले आहे.

23 प्रकरणांत कारवाई
प्रवाशांकडून ‘रेल मदत’द्वारे प्राप्त झालेल्या तक्रारी आणि केटरिंग युनिट्सच्या तपासणीदरम्यान आढळलेल्या अनियमिततांच्या आधारे जादा दर आकारणी व अन्य अनियमिततेच्या 21 प्रकरणांमध्ये संबंधितांवर लागू नियमानुसार दंड आकारून त्याची वसुली करण्यात आली आहे. याशिवाय आयआरआरटीसी अंतर्गत येणार्‍या दोन युनिट्सच्या प्रकरणांमध्ये दंडाची शिफारस करण्यात आली आहे. अशा प्रकारे एकूण 23 प्रकरणांमध्ये कारवाई करण्यात आली.

सहा युनिट्स तात्पुरती बंद
निर्धारित मानकांचे उल्लंघन केल्याप्रकरणी चार खठउढउ युनिट्स आणि दोन रेल्वे युनिट्स, अशा एकूण सहा केटरिंग युनिट्सना अकोला, भुसावळ आणि खंडवा येथे तात्पुरते बंद करण्यात आले आहे. या तपासण्यांमध्ये जादा दर आकारणी, स्वच्छता व हायजिनमध्ये त्रृटी, खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेतील कमतरता तसेच अन्य गंभीर अनियमितता आढळून आल्या. संबंधित युनिट्सकडून नियमांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी आणि भविष्यात अशा प्रकारच्या त्रुटींची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी ही कठोर कारवाई करण्यात आली.

अकोला, भुसावळमध्ये जादा दर आकारणीवर कारवाई
अकोला आणि भुसावळ येथे ‘रेल मदत’द्वारे प्राप्त झालेल्या जादा दर आकारणीच्या दोन तक्रारींवर विभागाने तात्काळ कारवाई केली. संबंधित केटरिंग युनिट्स तात्पुरती बंद करण्याबरोबरच लागू नियमानुसार दंड आकारून त्याची वसुली करण्यात आली. प्रवाशांकडून केवळ मंजूर आणि निर्धारित दरानुसारच शुल्क आकारले जावे, यासाठी विभागाकडून विशेष लक्ष दिले जात असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.

खाद्यपदार्थांची गुणवत्ता व स्वच्छतेवर भर
खंडवा येथे करण्यात आलेल्या तपासण्यांमध्ये खाद्य पदार्थांची गुणवत्ता, स्वच्छता आणि हायजिनशी संबंधित त्रुटी आढळून आल्या. त्यानंतर संबंधित केटरिंग युनिट्सवर कारवाई करून प्रतिबंधात्मक आणि सुधारात्मक उपाय म्हणून ती तात्पुरती बंद करण्यात आली. अकोला येथेही तपासणीदरम्यान गंभीर अनियमितता आढळून आल्याने दोन केटरिंग युनिट्स तात्पुरती बंद करण्यात आली आहेत.

पाच महिन्यांत 292 डिकॉय तपासण्या
भुसावळ विभागाने एप्रिल ते ऑगस्ट 2026 या कालावधीत विभागातील केटरिंग युनिट्समध्ये एकूण 292 डिकॉय तपासण्या केल्या. या तपासण्यांच्या माध्यमातून निर्धारित मानकांचे पालन, खाद्यपदार्थांची गुणवत्ता, ताजेपणा, स्वच्छता, हायजिन तसेच निर्धारित दरांची अंमलबजावणी यावर बारकाईने देखरेख ठेवण्यात आली.

‘रेल मदत’च्या तक्रारींवर सातत्याने लक्ष
भुसावळ विभागाकडून ‘रेल मदत’द्वारे प्राप्त होणार्‍या प्रवाशांच्या अभिप्रायाचे नियमित निरीक्षण केले जात आहे. तक्रार तथ्यात्मक आढळल्यास संबंधित प्रकरणात नियमानुसार योग्य ती कारवाई केली जात आहे. यासोबतच विभागातील विविध स्थानकांवरील केटरिंग आणि वाणिज्यिक युनिट्सची नियमित तपासणी करण्यात येत आहे. खाद्यपदार्थांची गुणवत्ता, ताजेपणा, स्वच्छता, हायजिन, निर्धारित दर आणि प्रवासी सेवेशी संबंधित नियमांचे पालन होत आहे की नाही, याची तपासणी या मोहिमेतून केली जात आहे.

प्रवाशांच्या हिताला प्राधान्य
प्रवाशांच्या तक्रारींवर तात्काळ दखल घेऊन त्रृटी आढळल्यास सुधारात्मक उपाययोजना करण्याचा भुसावळ विभागाचा दृष्टिकोन या कारवाईतून अधोरेखित झाला आहे. सेवा प्रदात्यांमध्ये जबाबदारीची भावना अधिक बळकट करणे, केटरिंग सेवेची गुणवत्ता सुधारणे आणि प्रवाशांना सुरक्षित, स्वच्छतापूर्ण व आरामदायी प्रवासाचा अनुभव उपलब्ध करून देणे, हा या कारवाईमागील प्रमुख उद्देश आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !