गणपती विसर्जन मिरवणुकीला जाण्यास मनाई : चोपडा तालुक्यात अल्पवयीनाने उचलले टोकाचे पाऊल

चिमुकला रिल्सच्या आहारी : चोपडा ग्रामीण पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद


चोपडा (सोमवार, 21 सप्टेंबर 2026) : चोपडा तालुक्यातील घुमावल गावातील इयत्ता सहावीमध्ये शिकणार्‍या 12 वर्षीय अल्पवयीन मुलाने
गणपती विसर्जन मिरवणुकीत जावू देण्यास मनाई केल्याच्या रागातून गळफास घेतला. या धक्कादायक घटनेनंतर गावात खळबळ उडाली आहे.

काय आहे प्रकरण ?
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित मुलगा आपल्या कुटुंबासह घुमावल बुद्रुक येथे राहत होता. गणपती विसर्जनाची मिरवणूक असल्याने त्याला त्यात सहभागी व्हायचे होते मात्र वडिलांनी त्याला मिरवणुकीत जाण्यास परवानगी न दिल्याने नाराज मुलाने घरातील तिसर्‍या मजल्यावर जात गळफास लावला.

काही वेळाने तो प्रतिसाद देत नसल्याचे लक्षात आल्यानंतर कुटुंबीयांनी त्याचा शोध घेतला असता प्रकार समोर आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

मोबाईलवर रिल्स पाहण्याची सवय असल्याचे पालकांचे म्हणणे
मृत मुलाला मोबाईलवर सतत रिल्स पाहण्याची सवय होती, अशी माहिती त्याच्या आई-वडिलांनी पोलिसांना दिली आहे.

या घटनेप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. अल्पवयीन मुलाच्या या दुर्दैवी मृत्यूने घुमावल बुद्रुक परिसरात हळहळ व्यक्त होत असून कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !