भुसावळच्या सामाजिक कार्याचा जिनिव्हापर्यंत गौरव !

संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवाधिकार विषयक आंतरराष्ट्रीय मंचावर शेख रफीक शेख मजीद सहभागी होणार !


भुसावळ (सोमवार, 21 सप्टेंबर 2026) : भुसावळच्या गल्लीबोळातून समाजसेवेची सुरुवात करून आंतरराष्ट्रीय व्यासपीठापर्यंत मजल मारणारे शिखर ऑर्गनायझेशन फॉर सोशल डेव्हलपमेंटचे प्रकल्प संचालक तथा महाराष्ट्र राज्य सचिव शेख रफीक शेख मजीद आता जिनिव्हा येथे होणार्‍या संयुक्त राष्ट्रसंघाच्या व्यवसाय व मानवाधिकार विषयक 15व्या आंतरराष्ट्रीय मंचात सहभागी होणार आहेत.

स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा येथील पॅलेस ऑफ नेशन्स येथे 23 ते 25 नोव्हेंबर 2026 दरम्यान हा मंच होणार आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या नोंदणी प्रणालीद्वारे शेख रफीक यांची नोंदणी मंजूर झाली असून त्यांना अधिकृत प्रवेश ओळखपत्रही प्राप्त झाले आहे.

जळगाव जिल्ह्यातील पहिला युवा सहभागी
या आंतरराष्ट्रीय मंचात सहभागी होणारे जळगाव जिल्ह्यातील पहिले युवा म्हणून शेख रफीक शेख मजीद यांचे नाव पुढे आले आहे. तसेच भुसावळ तालुक्यातून संयुक्त राष्ट्रसंघाच्या जिनिव्हा येथील व्यासपीठापर्यंत पोहोचणारे पहिले युवा म्हणूनही त्यांच्या या सहभागाकडे पाहिले जात आहे.

युवक, मानवाधिकार आणि सामाजिक न्यायावर मांडणार अनुभव
या मंचाच्या माध्यमातून युवकांना शिक्षण व कौशल्यविकासाच्या संधी, रोजगार व स्वावलंबन, महिला व बालकांचे अधिकार, सामाजिक समानता, वंचित घटकांचे प्रश्न तसेच शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविणे यांसारख्या विषयांवर आपल्या सामाजिक कार्याचा अनुभव मांडण्याचा त्यांचा प्रयत्न राहणार आहे.

17 वर्षांच्या समाजसेवेचा आंतरराष्ट्रीय प्रवास
सन 2009 पासून शिखर संस्थेशी जोडलेले शेख रफीक यांनी आरोग्य, शिक्षण, कौशल्यविकास, रोजगार, महिला सक्षमीकरण, शासकीय योजना आणि जनजागृती अशा विविध क्षेत्रांत काम केले आहे. गरजू नागरिकांसाठी वैद्यकीय शिबिरे, संगणक प्रशिक्षण, व्यावसायिक प्रशिक्षण, रोजगार मेळावे तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी उपक्रम राबविण्यात आले.

कोरोनाकाळातही मदतीचा हात
कोरोना महामारीच्या काळात गरजू व झोपडपट्टी भागातील नागरिकांना सुमारे महिनाभर मोफत अन्नवाटप करण्यात आले. परिसर स्वच्छता व निर्जंतुकीकरण तसेच शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जनजागृतीचे उपक्रमही राबविण्यात आले.

ऑक्सफर्ड, लंडनमध्ये आंतरराष्ट्रीय सन्मान
गेल्या 17 वर्षांतील सामाजिक कार्याची दखल घेत शेख रफीक शेख मजीद यांना मागील वर्षी ऑक्सफर्ड, लंडन येथे आंतरराष्ट्रीय सामाजिक कार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.

‘ही केवळ माझी उपलब्धी नाही, तर भुसावळची ओळख’
शेख रफीक शेख मजीद म्हणाले, भुसावळच्या तंग गल्लीबोळातून माझ्या सामाजिक कार्याची सुरुवात झाली. आज त्याच प्रवासाचा पुढचा टप्पा जिनिव्हापर्यंत पोहोचला आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारतातील युवा, मानवाधिकार आणि सामाजिक न्यायाशी संबंधित विषय मांडण्याची संधी मिळणे ही माझ्यासाठी मोठी जबाबदारी आहे. ही केवळ माझी उपलब्धी नाही, तर माझ्या भुसावळची, महाराष्ट्राची आणि भारताची ओळख आहे.

भुसावळपासून सुरू झालेला 17 वर्षांचा सामाजिक सेवेचा प्रवास आता जिनिव्हाच्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठापर्यंत पोहोचला असून, या सहभागामुळे स्थानिक सामाजिक कार्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर मांडण्याची संधी मिळणार आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !