पोषण आहार जागरण व बालविवाह मुक्त भारत अभियानांतर्गत विविध उपक्रम
भुसावळ (मंगळवार, 22 सप्टेंबर 2026) : प्रतिष्ठा महिला मंडळ, भुसावळतर्फे ‘सेवा संकल्प अभियान’ आणि ‘पोषण माह’ अंतर्गत विविध उपक्रम व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. ‘सही पोषण, देश रोशन’ तसेच ‘बालविवाह मुक्त भारत’ या अभियानांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली.
यांची होती उपस्थिती
प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी संजय सावकारे यांच्या संकल्पनेतून आयोजित या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांची प्रमुख उपस्थिती होती. तहसीलदार नीता लबडे, भुसावळ नगराध्यक्ष शैलजा पुरुषोत्तम नारखेडे तसेच डॉ.सावकारे यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन करीत उपक्रमाचे कौतुक केले. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे शहरी बालविकास प्रकल्प अधिकारी विजयसिंग परदेसी आणि ग्रामीण बालविकास प्रकल्प अधिकारी संध्या रोझतकर यांचीही उपस्थिती होती.
बालविवाह निर्मूलनाची सामूहिक शपथ
कार्यक्रमाच्या प्रारंभी बालविवाहाच्या कुप्रथेला आळा घालण्यासाठी उपस्थितांनी बालविवाह मुक्तीची सामूहिक शपथ घेतली. अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. सुनील जगन हिवाळे आणि दीपाली सुनील हिवाळे यांनी तयार केलेल्या सामाजिक संदेश देणार्या कलाकृती व उपक्रमांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
पाककला स्पर्धा व रांगोळी प्रदर्शन
पोषण आहाराचे महत्त्व जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी विविध पाककला स्पर्धा आणि रांगोळी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. पौष्टिक आहार, बालविवाह निर्मूलन आणि सामाजिक जनजागृतीचे संदेश या उपक्रमांमधून देण्यात आले. महिलांचे आरोग्य, पोषण आणि सामाजिक दर्जा उंचावण्यासाठी प्रतिष्ठा महिला मंडळ आणि एकात्मिक बाल विकास विभागाच्या माध्यमातून भविष्यातही अशा जनजागृतीपर उपक्रमांचे सातत्याने आयोजन करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.




