भुसावळात उद्या आरक्षण उपवर्गीकरण विरोधी लोक संघर्ष समितीची बैठक
भुसावळ (मंगळवार, 22 सप्टेंबर 2026) : आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात तसेच अनुसूचित जातीची एकता, सामाजिक न्याय आणि भारतीय संविधानाच्या रक्षणासाठी जळगाव येथे आयोजित करण्यात येणार्या ‘जन आक्रोश महामोर्चा’च्या पूर्व तयारीसाठी भुसावळात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार, 23 सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजता एससी-एसटी कार्यालय, डीआरएम कार्यालयाजवळ, भुसावळ येथे ही बैठक होणार आहे. रावेर लोकसभा मतदारसंघातील महामोर्चाच्या नियोजनाबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे.
या बैठकीस रावेर लोकसभा मतदारसंघातील अनुसूचित जातीअंतर्गत येणार्या 59 जातींचे सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते, आजी-माजी लोकप्रतिनिधी, विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी तसेच संविधानवादी कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन आरक्षण उपवर्गीकरण विरोधी लोक संघर्ष समिती, जळगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे.
4 ऑक्टोबरला जळगावात महामोर्चा
जळगावात रविवार, 4 ऑक्टोबर 2026 रोजी दुपारी दोन वाजता शिवतीर्थ मैदान, कोर्ट चौक येथून ‘जन आक्रोश महामोर्चा’ काढण्यात येणार आहे. रावेर लोकसभा क्षेत्रातून अनुसूचित जातीअंतर्गत येणार्या 59 जातींचे नागरिक या महामोर्चात सहभागी होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. महामोर्चाची रूपरेषा, सहभागींचे नियोजन आणि पूर्वतयारी याबाबत 23 सप्टेंबरच्या बैठकीत चर्चा होणार आहे. अनुसूचित जातीतील सर्व 59 जाती-समूहांनी तसेच संविधानप्रेमी नागरिकांनी आपल्या हक्क व अधिकारांच्या संरक्षणासाठी एकत्र यावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.




