भगवंतांच्या नामाने मनुष्य जीवनाला कोणत्याही क्षणी मिळेल नवी दिशा : यावलला श्रीकांत महाराज


यावल (मंगळवार, 22 सप्टेंबर 2026) : प्रतिपादन मंदिरात 20 सप्टेंबरपासून सुरू असलेल्या श्रीमद्भागवत कथा सप्ताहाच्या तिसर्‍या दिवशी भागवतकार श्रीकांत महाराज सराफ यांनी षष्ठ व सप्तम स्कंधातील विविध प्रसंगांचे भावपूर्ण निरूपण केले. यामध्ये भूगोल व भुवनकोशाचे वर्णन, अजामिळाची कथा, दक्ष प्रजापती, विश्वरूप, वृत्रासुराचे पूर्वचरित्र, मरुद्गणांची उत्पत्ती तसेच भक्त प्रल्हादाचे चरित्र यांचा समावेश होता. या प्रसंगांच्या माध्यमातून नामस्मरणाचे सामर्थ्य, कर्माचे महत्त्व, अहंकाराचा त्याग आणि संकटातही भगवंतावरील श्रद्धा कायम ठेवण्याचा संदेश त्यांनी दिला.

भुवनकोश व भूगोलाचे वर्णन करताना सृष्टीची व्यापकता आणि या विराट विश्वातील मानवाचे स्थान महाराजांनी स्पष्ट केले. त्यानंतर अजामिळाची कथा सांगताना नामस्मरणाचे सामर्थ्य अधोरेखित केले.
आयुष्य चुकीच्या मार्गावर गेलेल्या अजामिळाने अखेरच्या क्षणी ‘नारायण’ असा उच्चार केला. भगवंताचे नाम मनुष्याच्या जीवनाला कोणत्याही क्षणी नवी दिशा देऊ शकते, असा भाव त्यांनी या प्रसंगातून स्पष्ट केला.

दक्ष प्रजापतीच्या कथेतून अहंकाराचे परिणाम सांगताना मान-सन्मानापेक्षा नम्रता आणि भक्ती महत्त्वाची असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. विश्वरूपाच्या कथेत धर्मरक्षणाचा संदेश देण्यात आला. तर वृत्रासुराचे पूर्वचरित्र सांगताना बाह्य रूपापेक्षा अंतःकरणातील भगवंतनिष्ठा श्रेष्ठ असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. संकटाच्या काळातही भगवंताचे स्मरण सोडू नये, हा वृत्रासुराच्या चरित्राचा संदेश त्यांनी भाविकांसमोर मांडला.

यानंतर भक्त प्रल्हादाचे चरित्र सांगताना भागवतकार श्रीकांत महाराज सराफ यांनी प्रल्हादाची अढळ भक्ती भाविकांसमोर जिवंत केली. हिरण्यकशिपूने विविध प्रकारे छळ केला, तरी प्रल्हादाच्या मनातील भगवंतावरील श्रद्धा किंचितही डळमळली नाही. विष, सर्प, अग्नी आणि अनेक संकटे आली, तरी त्याने नामस्मरण सोडले नाही. ‘भगवंत सर्वत्र आहे’ हा प्रल्हादाचा दृढ विश्वास अखेर नृसिंह अवताराच्या रूपाने सत्य ठरल्याचे त्यांनी सांगितले.

बालवयात मिळालेले संस्कार, नामस्मरण आणि भगवंतावरील अढळ श्रद्धा जीवनाला योग्य दिशा देतात. संकटे कितीही मोठी असली तरी भक्ती आणि विश्वास सोडू नये, असे प्रतिपादन भागवतकार श्रीकांत महाराज सराफ यांनी केले. कथा ऐकण्यासाठी उपस्थित भाविकांनी विविध प्रसंगांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !