राज्यातील दुष्काळी तालुक्यांमध्ये जळगाव जिल्ह्यातील 15 तालुक्यांचा समावेश : मंत्री संजय सावकारे यांचा यशस्वी पाठपुरावा
नंदुरबार जिल्ह्यातील सहा तर धुळे जिल्ह्यातील चार तालुक्यांचा समावेश
गणेश वाघ
भुसावळ (शनिवार, 26 सप्टेंबर 2026) : पावसाने दीर्घ ओढ दिल्याने बळीराजावर कोसळलेल्या मोठ्या संकटानंतर राज्यातील फडणवीस सरकारने शेतकर्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. सरकारने राज्यातील 358 पैकी 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. ट्रीगर वनमध्ये जळगाव जिल्ह्यातील 15 तर खान्देशातील नंदुरबार जिल्ह्यातील सहा व धुळे जिल्ह्यातील चार तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. नाशिक येथे नुकत्याच झालेल्या बैठकीत भुसावळचे आमदार व राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्यासह सर्वच लोकप्रतिनिधींनी दुष्काळाची दाहकता बैठकीत मांडली होती.
मंत्र्यांसह जिल्हाधिकार्यांची उपस्थिती
दुष्काळाबाबत आढावा घेण्यासाठी अलीकडेच नाशिकमध्ये बैठक झाली. या बैठकीस कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, जलसंपदा मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. भुसावळचे आमदार व मंत्री संजय सावकारे यांनी जळगाव जिल्ह्यातील पीक स्थितीचा आढावा मांडत दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करीत विविध उपाययोजना सूचवल्या होत्या.
चालू वीज बिलात सुट
दुष्काळाच्या अनुषंगाने विविध उपाययोजना जाहीर करण्यात आल्या आहेत. जमीन महसुलात सूट, पीक कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीला स्थगिती, कृषीपंपाच्या चालू वीजबिलात सूट देण्यात आली आहे. 7.5 हॉर्सपॉवर क्षमतेच्या वीजपंपांचे वीज बिल आधीच माफ, आता त्यावरील वीज पंपांनाही सूट दिली आहे. त्याशिवाय शालेय/महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात माफी दिली जाणार आहे. रोजगार हमी योजना अंतर्गत नियमात शिथिलता आणून अधिकाधिक कामे सुरु करणार असून आवश्यक त्या ठिकाणी पिण्याचे टँकर्स दिले जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकर्यांच्या शेतीपंपाची वीजजोडणी खंडित होणार नाही, असे आश्वासन देण्यात आहे.
दुष्काळ संहितेतील ‘ट्रिगर-1’ निकषात जळगाव जिल्ह्यातील 15 तालुक्यांचा समावेश
जळगाव जिल्ह्यातील एरंडोल, पारोळा, धरणगााव, चोपडा, पाचोरा, जामनेर, जळगाव, भडगाव, अमळनेर, रावेर, चाळीसगाव, भुसावळ, बोदवड, मुक्ताईनगर, यावल
नंदुरबार जिल्ह्यातील सहा तालुक्यांचा समावेश
अक्कलकुवा, शहादा, नंदुरबार, नवापूर, तळोदा, अक्राणी
धुळे जिल्ह्यातील चार तालुक्यांचा समावेश
धुळे, साक्री, शिंदखेडा व शिरपूर