भुसावळातील सेंट अलॉयसीस-स्नेही जनतर्फे 2 ऑक्टोबरला रक्तदान शिबिर
महात्मा गांधी जयंतीनिमित्त आयोजन ; नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन
भुसावळ (बुधवार, 30 सप्टेंबर 2026) : महात्मा गांधी यांच्या 157व्या जयंतीनिमित्त ‘सेंट अलॉयसिस-स्नेही जन’ यांच्या वतीने शुक्रवार, 2 ऑक्टोबर 2026 रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर सेंट अलॉयसिस स्कूल ऑडिटोरियम, भुसावळ येथे सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत होणार आहे.
‘मानवसेवा हीच खरी ईश्वर सेवा’ या विचारातून आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराचा उद्देश गरजू रुग्णांना रक्त उपलब्ध होण्यासाठी सामाजिक योगदान देणे हा आहे. सेंट अलॉयसिस स्कूलने भुसावळ व परिसरातील विद्यार्थ्यांना अनेक वर्षांपासून शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली असून, शाळेच्या सामाजिक योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तसेच शहराशी असलेले नाते अधिक दृढ करण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
18 ते 65 वर्षे वयोगटातील, किमान 45 किलो वजन असलेले आणि निरोगी व्यक्ती रक्तदान करू शकतात. निरोगी व्यक्ती साधारणपणे तीन महिन्यांच्या अंतराने रक्तदान करू शकते, अशी माहिती आयोजकांनी दिली आहे. रक्तदानासाठी पूर्वनोंदणीची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या रक्तदान शिबिरास रेड क्रॉस सोसायटी ऑफ इंडिया, जळगाव यांचे सहकार्य लाभणार आहे. अधिकाधिक नागरिकांनी 2 ऑक्टोबर रोजी सेंट अलॉयसिस स्कूल ऑडिटोरियम येथे उपस्थित राहून रक्तदान करावे आणि ‘रक्तदान-जीवनदान’ या सामाजिक उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
