भुसावळातील नाहाटा महाविद्यालयात आजी-आजोबा, शिक्षक व विद्यार्थ्यांची संयुक्त बैठक
ज्येष्ठ नागरिकांच्या सन्मानाची सामूहिक शपथ; संस्कार आणि कृतज्ञतेचे महत्त्व अधोरेखित
भुसावळ (शुक्रवार, 2 ऑक्टोबर 2026) : ज्येष्ठ नागरिकांच्या सन्मानासह त्यांच्या अनुभवातून नव्या पिढीला संस्कारांची जोड मिळावी, या उद्देशाने नाहाटा महाविद्यालयातील माता पालक समितीच्या वतीने आजी-आजोबा, शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या ‘ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी उपाययोजना’ या उपक्रमांतर्गत झालेल्या या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करून त्यांच्या प्रतिष्ठेचा आदर करण्याची सामूहिक शपथ घेण्यात आली.
यांची होती उपस्थिती
माता-पालक समिती प्रमुख प्रा.किर्ती नागदेव यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाची भूमिका स्पष्ट केली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी. एच.बर्हाटे अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून कला व विज्ञान महाविद्यालय, भालोद येथील मराठी विभागप्रमुख प्रा.डॉ.जतीन श्रीधर मेढे उपस्थित होते. उपप्राचार्य प्रा.वाय.एम.पाटील व पर्यवेक्षक प्रा. स्वाती पाटील यांचीही प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या प्रतिष्ठेचा आदर करण्याची सामूहिक शपथ घेतली. उपस्थित आजी-आजोबांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
‘आजी-आजोबा हीच संस्कारांची शिदोरी’
प्रा.डॉ.जतीन मेढे यांनी मार्गदर्शन करताना आजी-आजोबांचे महत्त्व अधोरेखित केले. विज्ञान-तंत्रज्ञानामुळे जीवनमान बदलले असले तरी माणुसकी आणि कौटुंबिक संस्कार जपणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. आजी-आजोबा हे संस्कृती, अनुभव आणि संस्कारांचे खरे वाहक असून त्यांची काळजी घेणे व त्यांचा सन्मान करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले.
आजी-आजोबांच्या संस्कारांमुळे व्यक्तिमत्त्व घडण्यास मदत
प्राचार्य डॉ.बी.एच.बर्हाटे यांनी अध्यक्षीय भाषणात आजी-आजोबांच्या संस्कारांमुळे व्यक्तिमत्त्व घडण्यास मोठी मदत होते, असे सांगितले. आज दोन्ही पालक नोकरी करणार्या कुटुंबांमध्ये मुलांच्या संगोपनात आजी-आजोबांची भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले. ज्यांनी आपल्याला घडविले, त्यांच्याप्रती कृतज्ञ राहून घेतलेल्या शपथेचे मनापासून पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.स्वाती चौधरी तर आभार प्रा.अर्चना सपकाळे यांनी मानले. यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील उपप्राचार्य, पर्यवेक्षक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांचे सहकार्य लाभले.


