भुसावळात रेल्वे विभागातर्फे स्वच्छता रॅली


भुसावळ (शुक्रवार, 2 ऑक्टोबर 2026) : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात स्वच्छता पंधरवडा-2026 अंतर्गत शुक्रवार, 2 ऑक्टोबर 2026 रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त तसेच स्वच्छ भारत दिनानिमित्त स्वच्छता रॅली काढण्यात आली. मंडळ रेल प्रबंधक कार्यालयापासून रेल्वे स्कूल हा रॅलीचा मार्ग होता.

यांचा रॅलीत सहभाग
रॅलीचे नेतृत्व मंडळ रेल प्रबंधक पुनीत अग्रवाल यांनी केले. रॅलीमध्ये विभागातील अधिकारी, रेल्वे कर्मचारी, रेल्वे स्कूलचे शिक्षक व विद्यार्थी तसेच गांधी रिसर्च फाउंडेशनचे सदस्य यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. रेल्वे स्कूलमध्ये मंडळ रेल प्रबंधक पुनीत अग्रवाल यांनी सर्व शाखाधिकारी, कर्मचारी तसेच रेल्वे स्कूलच्या विद्यार्थ्यांना स्वच्छतेची शपथ दिली. यावेळी सर्वांनी आपल्या परिसरात स्वच्छता राखण्यासोबतच स्वच्छ भारताच्या निर्मितीत सक्रिय योगदान देण्याचा संकल्प केला.

मंत्र्यांच्या हस्ते वृक्षारोपण
रेल्वे स्कूलमध्ये ‘एक झाड आईच्या नावाने’ या अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. मंडळ रेल प्रबंधक पुनीत अग्रवाल यांच्यासह विभागातील वरिष्ठ अधिकार्‍यांनीही वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धन तसेच हरित व स्वच्छ वातावरण निर्मितीप्रती आपली बांधिलकी व्यक्त केली. या कार्यक्रमास विभागातील वरिष्ठ अधिकारी, रेल्वे कर्मचारी, रेल्वे स्कूलचे शिक्षक व विद्यार्थी तसेच गांधी रिसर्च फाउंडेशनचे सदस्य उपस्थित होते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !