भुसावळात प्लॉस्टीक पिशव्या 132 केव्ही लाईनवर अडकल्याने शॉर्ट सर्किट : सहा केंद्राचा वीजपुरवठा ठप्प
भुसावळ (शनिवार, 3 ऑक्टोबर 2026) : पालिकेच्या खेडी शिवारातील डंपिंग ग्राउंडवरील कचर्याला शुक्रवार, 2 रोजी दुपारी एक ते सव्वा वाजेच्या दरम्यान अचानक आग लागली. या आगीमुळे कचर्यातील प्लास्टिक पिशव्या व फॉईल पेपर हवेत उडून महापारेषण 132 केव्ही टॉवर लाईनवर अडकले. प्लास्टिक पिशव्या व फॉईल पेपरचा दोन विजतारांना स्पर्श होऊन फेज टू फेज झाल्याने शॉर्टसर्किट झाले. यामुळे भुसावळ शहरासह तालुक्यातील 33 बाय 11 केव्हीच्या सहा उपकेंद्रांचा पुरवठा ठप्प झाला. या दुर्घटनेत महापारेषणच्या दीपनगर 132 केव्ही केंद्रातील सर्किट ब्रेकही जळून खाक झाला.
अडीच तासांनी स्टॅण्डबाय जोडणी
अडीच तासांनी दुपारी तीन ते सव्वातीन वाजेच्या दरम्यान महापारेषणने दीपनगर- पाचोरा 132 केव्ही उपकेंद्राला जोडणार्या लाइनवर ‘स्टँडबाय’ जोडणी घेऊन भुसावळ शहर व तालुक्यातील निम्म्या भागाचा वीजपुरवठा सुरळीत केला. सायंकाळी उशिरापर्यंत दीपनगर येथील सर्किट ब्रेकरच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने अर्धा तालुका रात्री उशिरापर्यंत अंधारातच होता.
यंत्रणा कोलमडली
महापारेषण कंपनीच्या खेडी 132 केव्ही केंद्रातून शहरातील तापीनगर, नाहाटा, भुसावळ एमआयडीसी तसेच चोरवड, किन्ही व कुर्हा अशा 33 बाय 11 केव्हीच्या सहा उपकेंद्रांना वीजपुरवठा केला जातो. या घटनेमुळे 132 केव्ही खेडी केंद्रालाच वीजपुरवठा बंद झाल्याने संपूर्ण तालुक्यात वीजपुरवठा बंद होता. टॉवरुन प्लास्टिक हटवले महापारेषण कंपनीच्या कर्मचार्यांनी वीजपुरवठा खंडीत करुन अवघ्या दोन तासांमध्ये टॉवर लाइनवर अडकलेले प्लास्टिकच्या मोठ्या पिशव्या, फॉईल पेपर काढले. महावितरणचे कार्यकारी अभियंता एम. आर. पाटील यांनी भेट देवून पाहणी केली. खेडी केंद्राचे उपकार्यकारी अभियंता हर्षल लोखंडे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता नितीन काकडे, जितेंद्र फुलवाणी व आठ कर्मचार्यांच्या पथक उपस्थित होते.


