भुसावळ विभागात 15 डिसेंबरला पेन्शन अदालत


भुसावळ (शनिवार, 3 ऑक्टोबर 2026) : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात सेवानिवृत्त रेल्वे कर्मचार्‍यांच्या पेन्शनसंबंधी तक्रारींचे तत्परतेने निराकरण करण्याच्या उद्देशाने पेन्शन अदालतीचे मंगळवार, 15 डिसेंबरला सकाळी 11 वाजता मंडल रेल प्रबंधक कार्यालयात (डीआरएम ऑफिस) आयोजन करण्यात आले आहे.

पेन्शनबाबत तक्रारींचे होणार निरसन
पेन्शनधारकांच्या पेन्शन व सेटलमेंटशी संबंधित तक्रारींचे विद्यमान शासकीय धोरणे व मार्गदर्शक सूचनांनुसार तत्परतेने निराकरण करण्यात येईल. पेन्शन अदालतीमध्ये केवळ पेन्शनशी संबंधित प्रकरणेच विचारात घेतली जातील. धोरणात्मक बाबींचा समावेश असलेली प्रकरणे, जसे की कौटुंबिक पेन्शन, नाव समाविष्ट करण्यासंबंधीची प्रकरणे इत्यादी तसेच न्यायालयीन/कायदेशीर प्रकरणे पेन्शन अदालतीमध्ये विचारात घेतली जाणार नाहीत. मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातून सेवानिवृत्त झालेले आणि पेन्शन व सेटलमेंट देयकांबाबत तक्रारी असलेले पेन्शनधारक आपले तक्रार अर्ज तीन प्रतींमध्ये मंडल रेल प्रबंधक (कार्मिक), भुसावळ यांच्याकडे सादर करू शकतात. अर्जामध्ये नाव, पद, सेवेत रुजू झाल्याची तारीख, बँक खाते क्रमांक, बँकेचा आयएफसी क्रमांक तसेच तक्रारीचे स्वरूप स्पष्टपणे नमूद करावे. अर्जासोबत पेन्शन पेमेंट ऑर्डर, बँकेची पेन्शन स्लिप, पासबुकची छायांकित प्रत तसेच तक्रारीशी संबंधित आवश्यक कागदपत्रे जोडावीत. तक्रार अर्ज मंडल रेल प्रबंधक कार्यालय, भुसावळच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळील ड्रॉप बॉक्समध्ये जमा करता येतील. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख शुक्रवार, 30 ऑक्टोबर 2026 आहे.

भुसावळ विभागातील संबंधित सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी व पेन्शनधारकांनी या पेन्शन अदालतीचा लाभ घेऊन आपल्या पेन्शनसंबंधी तक्रारी निर्धारित मुदतीत सादर कराव्यात, असे आवाहन मध्य रेल्वे, भुसावळ विभागातर्फे करण्यात आले आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !