भुसावळ रेल्वे सुरक्षा बलाची मोठी कामगिरी : चोरीच्या 13 मोबाईलसह छत्तीसगडचा चोरटा जाळ्यात
भुसावळ-मलकापूरदरम्यान विविध गाड्यांमधून मोबाईल फोनची केली चोरी
भुसावळ (सोमवार, 5 ऑक्टोबर 2026) : पुणे-दानापूर स्पेशल एक्स्प्रेसमधील प्रवाशाचा मोबाईल चोरीच्या तपासादरम्यान भुसावळ रेल्वे सुरक्षा बलाने समन्वयातून छत्तीसगडच्या मोबाईल चोरट्याला तब्बल 13 चोरीच्या मोबाईल फोनसह बेड्या ठोकल्या. जप्त मोबाईलची एकूण अंदाजे किंमत दोन लाख 97 हजार 500 आहे.
चोरीनंतर आरोपी जाळ्यात
रविवार, 4 ऑक्टोबर रोजी ट्रेन क्रमांक 01449 पुणे-दानापूर स्पेशलच्या एस थ्री डब्यातून प्रवाशाचा मोबाइल चोरीला गेल्याची माहिती रेल मदत अॅपद्वारे मिळाल्यानंतर भुसावळ सीपीडीएस पथकाने स्थानकातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. संशयित व्यक्ती ट्रेनमधून उतरून स्थानकाबाहेर जाताना तसेच पुन्हा स्थानकात येऊन भुसावळ-बडनेरा मेमूमध्ये चढताना आढळली. सीसीटीव्ही फुटेज आणि संशयिताची माहिती अकोला आरपीएफला देण्यात आली. मलकापूर व अकोला आरपीएफच्या संयुक्त कारवाईदरम्यान मलकापूर स्थानकावर कर्तव्यावर असलेले सहायक सुरक्षा निरीक्षक वीरपाल सिंह तसेच अकोला आरपीएफ पथकातील प्र.आ.गणेश जकाते आणि आ. गोविंद सिंह यांनी संशयित व्यक्तीला मलकापूर स्थानकावर बेड्या ठोकल्या.
चोरीचे 13 मोबाईल जप्त
अटकेतील आरोपीने आपले नाव अंकित साहू उर्फ दीपक साहू (25, रा.इंद्रानगर, कोरबा, छत्तीसगड) असे सांगितले. त्याच्या निळ्या रंगाच्या बॅगेतून सॅमसंग, ओप्पो, रियलमी, वनप्लस, रेडमी, विवो, इन्फिनिक्स आणि जिओ भारत या कंपन्यांचे 13 मोबाइल जप्त करण्यात आले. प्राथमिक चौकशीत हे मोबाइल मागील एक ते दोन दिवसांत भुसावळ-मलकापूरदरम्यान धावणार्या विविध रेल्वेगाड्यांमधून चोरी केल्याची कबुली त्याने दिली.
आरोपी लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात
आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील कायदेशीर कारवाईसाठी जीआरपी भुसावळच्या ताब्यात देण्यात आला. आरोपीच्या अटकेनंतर मोबाईल चोरीचे अनेक गुन्हे उघडकीस येणार आहे. जप्त मोबाईलच्या मालकीबाबतही आयएमई क्रमांकाद्वारे पडताळणी केली जात आहे.


