पीक विम्यातील तापमान निकषांची विसंगती अन्यायकारक : धनंजय चौधरी

रावेर-यावलच्या शेतकर्‍यांना न्याय मिळायला हवा


रावेर (सोमवार, 5 ऑक्टोबर 2026) : पीक विम्याच्या जाहीर झालेल्या नुकसान भरपाईमध्ये रावेर व यावल तालुक्यातील महसूल मंडळांमध्ये मोठी तफावत दिसून येत आहे. उन्हाळी व हिवाळी तापमानाचे दोन्ही निकष पूर्ण झालेल्या मंडळांना अधिक भरपाई, तर हिवाळी तापमानाचा निकष नोंदविला न गेलेल्या मंडळांना कमी भरपाई देण्यात आली आहे. प्रशासन व संबंधित यंत्रणेचा हा प्रकार अत्यंत असमाधानकारक असून शेतकर्‍यांवर अन्याय करणारा आहे.

अशी आहे भरपाई नमूद
रावेर तालुक्यात ऐनपूर, केर्‍हाळे बु.॥, खानापूर, खिर्डी बु. व निंभोरा बु.॥ या मंडळांना 85 हजार तर पाल व रावेरला 74 हजार 671 आणि खिरोदा प्र.॥ यावल व सावदा मंडळांना 52 हजार 821 भरपाई नमूद आहे. यावल तालुक्यात फैजपूर, किनगाव बु.॥ व साकळीला 74 हजार 671, भालोद, सावखेडासीम व यावलला 52 हजार 821 तर अंजाळे व बामणोदला 42 हजार 500 भरपाई नमूद आहे.

शेतकर्‍यांना वाढीव भरपाई द्या
एकमेकांना लागून असलेल्या महसूल मंडळांतील गावांमध्ये हवामानाची परिस्थिती समान असताना एका मंडळात तापमानाचा निकष पूर्ण होतो आणि त्याच्या सीमेलगतच्या दुसर्‍या मंडळात तो पूर्ण होत नाही, हे अतार्किक आणि वस्तुस्थितीला न पटणारे आहे. तापमान महसूल मंडळांच्या प्रशासकीय सीमा पाहून बदलत नाही. त्यामुळे कमी नुकसानभरपाई निश्चित झालेल्या मंडळांतील तापमानाच्या नोंदी व हवामान केंद्रांची अचूकता यांची लगतच्या मंडळांच्या नोंदींसह तातडीने फेरतपासणी करून योग्य ती वाढीव नुकसानभरपाई देण्यात यावी. तांत्रिक अथवा प्रशासकीय त्रुटीचा आर्थिक फटका शेतकर्‍यांना बसू देणार नाही, ही आमची ठाम भूमिका असल्याचे जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटी (ग्रामीण पूर्व) अध्यक्ष धनंजय शिरीष चौधरी म्हणाले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !