निमखेडी शिवारात अज्ञात वाहनाच्या धडकेने शेतकरी ठार
जळगाव (सोमवार, 5 ऑक्टोबर 2026) : जळगाव शहरातील निमखेडी शिवारात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर अज्ञात वाहनाने दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात 42 वर्षीय शेतकरी समाधान भगवान कोळी यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर अज्ञात वाहनचालक वाहनासह घटनास्थळावरून पसार झाला.
अज्ञात वाहनाची धडक
समाधान भगवान कोळी (42, रा.प्लॉट क्रमांक 16, गट क्रमांक 766, शिवधाम मंदिराजवळ, निमखेडी शिवार, जळगाव) हे 1 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास काम आटोपून घरी परत जात असताना निमखेडी शिवारातील साई पॅलेस हॉटेलजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर अज्ञात वाहनावरील चालकाने जोरदार धडक दिली. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. गंभीर जखमी अवस्थेत समाधान कोळी यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. जळगाव तालुका पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक शामकुमार मोरे करीत आहेत.


