साकेगाव फार्मसी कॉलेजमध्ये धाडसी घरफोडी : विद्यार्थ्यांच्या फीचे दिड लाख लांबवले
साकेगाव, ता.भुसावळ (मंगळवार, 6 ऑक्टोबर 2026) : साकेगाव येथील कै.यशोदाबाई दगडू सराफ संचलित कॉलेज ऑफ फार्मसीमधून चोरट्यांनी विद्यार्थ्यांच्या फीचे एक लाख 57 हजार 983 रुपये लांबवल्याचा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली. या प्रकरणी सोमवारी भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
महाविद्यालयात चोरीने खळबळ
2 रोजी सायंकाळी पाच ते 3 ऑक्टोबर रोजी सकाळी सहा वाजेदरम्यान चोरट्यांनी फार्मसी महाविद्यालयातील कार्यालयाचा व प्राचार्यांच्या कॅबीनचे कडी-कुलूप तोडून प्रवेश केला व लाकडी टेबलच्या ड्रॉवरमध्ये विद्यार्थ्यांच्या फीचे जमलेले एक लाख 57 हजार 983 रुपये लांबवले. कार्यालय अधीक्षक धनराज पंडित तळेले (40, रा. भुसावळ) यांनी भुसावळ तालुका पोलिसात फिर्याद दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला.
रेकी करून चोरीची शक्यता
कॉलेजमध्ये सध्या प्रवेश प्रक्रिया सुरू असून 2 ऑक्टोबर रोजी एकूण 1 लाख 50 हजार 983 रुपये प्रवेश फीची रक्कम कार्यालय अधीक्षक धनराज तळेले यांनी टेबलाच्या ड्रॉवरमध्ये ठेवली होती. सायंकाळी ऑफिस
बंद करून वॉचमन विठ्ठल भारंबे यांना सूचना देऊन तळेले घरी गेले मात्र चोरट्याने थेट तीच कॅबीन आणि तोच ड्रॉवर टार्गेट केला, जिथे फीची रोख रक्कम होती त्यामुळे चोरट्याने आधीच रेकी केल्याचा संशय आहे. परिवेक्षाधीन डीवायएसपी प्रशांत दरेकर, हवालदार वाल्मीक सोनवणे, जगदीश भोई, सचिन पारधी आणि संजय भोई यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. परिसरातील सीसीटीकी फुटेज आणि मिळालेल्या सुगाव्यांच्या आधारे पोलीस चोरट्याचा तपास करीत आहेत.


