भुसावळातील दे.ना.भोळे महाविद्यालयात मिशन साहसी अभियानातून युवतींसाठी योग प्रशिक्षण
भुसावळ (मंगळवार, 6 ऑक्टोबर 2026) : दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात युवती सभा अंतर्गत ‘मिशन साहसी अभियान’ या उपक्रमाच्या माध्यमातून युवतींसाठी योग प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात पार पडला. युवतींचे शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ राहावे, तसेच त्यांच्यात आत्मविश्वास, एकाग्रता आणि सकारात्मक दृष्टिकोन विकसित व्हावा या उद्देशाने प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले.
यांची होती उपस्थिती
अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.पी.फालक होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक व योग प्रशिक्षक प्रा.डॉ.सीमा देवेंद्र पाटील, प्रा.डॉ. संजय चौधरी, प्रा.संगीता धर्माधिकारी उपस्थित होत्या.
निरोगी जीवनशैलीसाठी नियमित योगाभ्यास गरजेचा
प्रा.डॉ.सीमा देवेंद्र पाटील यांनी योगाचे शारीरिक, मानसिक व भावनिक आरोग्यावर होणारे सकारात्मक परिणाम स्पष्ट केले. त्यांनी विविध योगासने, प्राणायाम आणि ध्यानधारणेचे प्रात्यक्षिक सादर करून त्यांचे महत्त्व विशद केले. युवतींनी निरोगी जीवनशैलीसाठी दैनंदिन जीवनात नियमित योगाभ्यासाचा समावेश करावा, असे आवाहन त्यांनी केले.
व्यक्तिमत्त्व विकासाकडे लक्ष देणे गरजेचे
प्राचार्य डॉ.आर.पी.फालक यांनी विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. शिक्षणासोबतच आरोग्य, आत्मसंरक्षण, मानसिक सक्षमीकरण आणि व्यक्तिमत्त्व विकासाकडे युवतींनी गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
‘मिशन साहसी अभियान’ अंतर्गत झालेल्या या योग प्रशिक्षणामुळे युवतींमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण होऊन नियमित योगाभ्यासाची प्रेरणा मिळाली. कार्यक्रमाला युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सूत्रसंचालन प्रा.डॉ.माधुरी पाटील यांनी तर आभार प्रा.संगीता धर्माधिकारी यांनी मानले. यशस्वीतेसाठी प्रा.डॉ.एस.डी.चौधरी, प्रा.डॉ.अंजली पाटील, प्रा.सुशीला भाटे यांनी परिश्रम घेतले.


