पालला 14 वर्षांनंतर पुन्हा भरला गुरांचा बाजार

लिलावाला सुरुवात : शेतकर्‍यांसह पशूपालकांना मोठा दिलासा


रावेर (मंगळवार, 6 ऑक्टोबर 2026) : रावेर तालुक्यातील पाल येथील बंद असलेला गुरांचा बाजार तब्बल 14 वर्षांनंतर पुन्हा सुरू करण्यात आला आहे. 2012 पासून बंद असलेला गुरांचा लिलाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पुढाकाराने मंगळवार, 6 ऑक्टोबरपासून पुन्हा सुरू करण्यात आल्याने पालसह परिसरातील शेतकरी, पशुपालक आणि पशुधन व्यापार्‍यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

गैरसोय झाली दूर
पाल उपबाजार आवारात दर मंगळवारी गुरे-ढोरे तसेच शेळ्या-मेंढ्यांची खरेदी-विक्री केली जाणार आहे. बाजार बंद असल्याने गेल्या काही वर्षांपासून शेतकरी व पशुपालकांना जनावरांच्या विक्रीसाठी इतर ठिकाणी जावे लागत होते. आता पाल येथेच बाजार सुरू झाल्याने त्यांची गैरसोय दूर होणार आहे. पालमधील ग्रामीण रुग्णालयासमोरील उपबाजार आवारात हा बाजार भरविण्यात येणार आहे. परिसरातील शेतकरी, गुरे व्यापारी, शेळी-मेंढी व्यापारी तसेच गुरे दलाल यांनी आपली जनावरे खरेदी-विक्रीसाठी पाल उपबाजारात आणावीत आणि बाजार समितीला सहकार्य करावे, असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

बाजार पुन्हा सुरू करण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रल्हाद पाटील, उपसभापती मनिषा पाटील, सचिव कमलेश पाटील तसेच संचालकांनी पुढाकार घेतला असून पाल परिसरातील पशूधन व्यवहारांना पुन्हा चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !