प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या : जळगावात तरुणाने उचलले टोकाचे पाऊल ; तिघांविरोधात गुन्हा
जळगाव (बुधवार, 6 ऑक्टोबर 2026) : मावस बहिणीच्या प्रेमसंबंधाला विरोध केल्याच्या कारणावरून तरुणाला वारंवार धमकावून त्रास दिल्यानंतर 28 वर्षीय तरुणाने आत्महत्या केली. या प्रकरणी संतप्त नातेवाईकांनी आरोपींविरोधात कारवाईची मागणी केल्यानंतर तिघांविरोधात जळगाव तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. प्रशांत संजय सोनवणे (28, देऊवाडे, ता.जळगाव ,ह.मु.जैनाबाद, पल्लवी किराणाजवळ, जळगाव) असे मृताचे नाव आहे.
काय आहे प्रकरण
प्रशांत संजय सोनवणे (28, रा.देऊळवाडा, ता. जि. जळगाव, सध्या जैनाबाद परिसरात वास्तव्यास) असे मृत तरुणाचे नाव आहे. पोलिसांकडे दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, प्रशांतच्या मावस बहिणीचे संदीप महाजन याच्यासोबत प्रेमसंबंध होते. या संबंधांना प्रशांतचा विरोध असल्याच्या कारणावरून संदीप महाजन, विशाल महाजन तसेच त्यांच्या आईकडून प्रशांतला वारंवार अडवून धमकावले जात होते. या प्रकारामुळे प्रशांत मानसिक त्रासात असल्याने त्याने मंगळवार, 6 ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसहा पूर्वी आसोदा उड्डाणपुलाजवळ आत्महत्या केली. प्रशांतला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणण्यात आले असता त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.
तिघांविरोधात गुन्हा दाखल
या प्रकरणी तालुका पोलिसात अमर किरण सोनवणे (23, देऊळवाडे, ता.जळगाव) यांच्या तक्रारीवरून संशयीत संदीप महाजन, विशाल महाजन व त्याची आई (नाव माहित नाही) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय पाटील करीत आहेत.


