भुसावळ रेल्वे स्थानकावर हेरिटेज स्टेशन महोत्सव उत्साहात
भुसावळ (बुधवार, 7 ऑक्टोबर 2026) : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात हेरिटेज स्टेशन महोत्सव अंतर्गत 7 रोजी भुसावळ रेल्वे स्थानकावर हेरिटेज स्टेशन महोत्सव उत्साहात आयोजित करण्यात आला. स्थापनेपासून 100 वर्षांहून अधिक कालावधी पूर्ण केलेल्या भुसावळ स्थानकाच्या गौरवशाली इतिहासाचा आणि समृद्ध रेल्वे वारशाचा उत्सव या निमित्ताने साजरा करण्यात आला.
विद्यार्थी व नागरिकांचा सहभाग
विरासत आणि सेवेचे प्रतीक असलेले भुसावळ रेल्वे स्थानक अनेक वर्षांपासून स्थानिक नागरिक आणि प्रवाशांशी घट्ट नाते जपत आले आहे. या गौरवशाली परंपरेचा उत्सव साजरा करण्याच्या उद्देशाने मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातर्फे हेरिटेज स्टेशन महोत्सव आयोजित करण्यात आला. या महोत्सवात विद्यार्थी, स्थानिक नागरिक आणि प्रवाशांनी उत्साहपूर्वक सहभाग नोंदविला. प्रसंगी यांत्रिक विभागातर्फे विशेष प्रदर्शनी आयोजित करण्यात आली होती. या प्रदर्शनात कोच, वॅगन तसेच विद्युत इंजिनांसह विविध रेल्वे संपत्तीचे प्रदर्शन करण्यात आले. विद्यार्थी आणि प्रवाशांना रेल्वेच्या कार्यप्रणालीची प्रत्यक्ष झलक पाहण्याची तसेच रेल्वेच्या विविध तांत्रिक बाबी समजून घेण्याची संधी मिळाली.
स्थानकाचा वारसा अभिमानाचे प्रतीक
यावेळी भारतीय रेल्वेच्या समृद्ध वारशावर आधारित एक लघुचित्रफीतही दाखविण्यात आली. या चित्रफितीत भारतीय रेल्वेचा ऐतिहासिक प्रवास, जुन्या काळातील रेल्वेगाड्या, ऐतिहासिक महत्त्वाची रेल्वे स्थानके, कालानुरूप झालेले विविध तांत्रिक बदल तसेच भारतीय रेल्वेच्या विकासातील महत्त्वपूर्ण टप्प्यांची माहिती देण्यात आली. या उपक्रमाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे शालेय शालेय विद्यार्थ्यांनी स्थानकाच्या प्रतिमेने सजवलेला एक विशेष स्मृती केक कट करण्यात आला, जो स्थानकाचा वारसा आणि स्थानिक अभिमानाचे प्रतीक होता. या कार्यक्रमास अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक (तांत्रिक) एम.के.मीना, अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक (प्रशासन) प्रवीण कुमार पाठक, इतर रेल्वे अधिकारी, रेल्वे स्कूलचे शिक्षक तसेच विद्यार्थी उपस्थित होते.


