एक हजारांचे लाच प्रकरण : आमोद्यातील लाचखोर तलाठ्याला तीन दिवसांची कोठडी
फैजपूर (मंगळवार, 6 ऑक्टोबर 2026) : सातबारा उतार्यावर कुपनलिकेची नोंद करण्यासाठी तडजोडीअंती एक हजारांची लाच स्वीकारताना यावल तालुक्यातील आमोदा तलाठी शैलेश अंकुश झोटे (सौभाग्यनगर, रावेर, मूळ रा.मेहकर, जि.बुलढाणा) यास जळगाव एसीबीने अटक केली होती. झोटे यांना बुधवारी भुसावळ सत्र न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
काय आहे प्रकरण
तक्रारदार हे 36 वर्षीय शेतकरी आहेत. शासन योजनेंतर्गत सोलर सिस्टीम बसवण्यासाठी सातबारा उतार्यावर कुपनलिकेची नोंद आवश्यक असल्याने त्यांनी आमोदा तलाठी शैलेश झोटे यांनी भेट घेतल्यानंतर त्यांनी कामाच्या बदल्यात चार हजारांची लाच मागितली होती व त्यावेळी तक्रारदाराने तीन हजार पाचशे रुपये दिले होते मात्र 2 ऑक्टोबर रोजी तक्रारदार कामाबाबत विचारणा करण्यासाठी गेल्यानंतर तलाठी झोटे यांनी उर्वरीत पाचशे रुपयांची लाच व सातबारा उतार्यांची नोंद देण्यासाठी पाचशे रुपये मिळून एकूण एक हजारांची लाच मागितली. तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार दिल्यानंतर लाच पडतळणी करून सापळा रचून आरोपीला अटक करण्यात आली. बुधवारी भुसावळ अतिरीक्त सत्र न्यायालयाने आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
उद्या पथक यावलला येणार !
आरोपीने तक्रारदाराकडून यापूर्वीच साडेतीन हजार रुपये स्वीकारले आहेत शिवाय तक्रारदाराचे काम करून देण्यासाठी आरोपी लॉगीन आय.डी.द्वारे नेमकी काय प्रक्रिया केली याची तपासणी करण्यासाठी एसीबीचे पथक गुरुवारी यावल येथे येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. या गुन्ह्याचा तपास जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर करीत आहेत.


