‘उजेड पेरणारी माणसं’ पुस्तकाचे शीर्षक काळजाला भिडते : जळगावात राज्याचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांचा विश्वास


जळगाव (गुरुवार, 8 ऑक्टोबर 2026) : समाजमाध्यमे आणि रीलच्या जाळ्यात आजची नवी पिढी गुरफटलेली असून वाचनाची आवड कमी होत चालली आहे. मात्र, अशा प्रतिकूल परिस्थितीतही ‘उजेड पेरणारी माणसं’ या पुस्तकाची दुसरी आवृत्ती प्रकाशित होणे ही अत्यंत कौतुकास्पद बाब आहे. हे पुस्तक वाचकांसाठी खर्‍या अर्थाने प्रेरणादायी ठरेल पुस्तकाचे शीर्षक काळजाला भिडते, असा विश्वास राज्याचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी व्यक्त केला.

जळगावात डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालय (स्वायत्त), मराठी भाषा विभाग आणि उत्तर महाराष्ट्र प्रगतिशील लेखक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आनंदा पाटील लिखित ‘उजेड पेरणारी माणसं’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा बुधवारी पार पडला.

अभिजात मराठी भाषा सप्ताहाच्या औचित्याने आयोजित या कार्यक्रमात पुस्तकाचे प्रकाशन त्यांच्याहस्ते करण्यात आले प्रसंगी ते बोलत होते.पुण्याच्या ‘पेन पब्लिशिंग हाऊस’ने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. नारखेडे होते, तर अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे माजी सदस्य किशोर मेढे यांची प्रमुख उपस्थिती होती.

विचारमंचावर उत्तर महाराष्ट्र प्रगतिशील लेखक संघाचे संघटक डॉ. मिलिंद बागूल, उपप्राचार्य तथा मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. सत्यजित साळवे, उपप्राचार्य प्रा. डॉ. प्रमोद तायडे व प्रा. एन. जी. बावस्कर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, कार्यकारी अभियंता सतिश शिसोदे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक पवार यांनी केले. यशस्वीतेसाठी बापूराव पानपाटील, प्रा. मेघा बारी, प्रा. निकिता सोनवणे, ज्योती वाघ-बाविस्कर, प्रा. शीतल चौधरी यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले.

शिर्षक थेट काळजाला भिडते
‘उजेड पेरणारी माणसं’ हे पुस्तकाचे शिर्षक उत्कंठावर्धक आणि सकारात्मकतेचा संदेश देणारे आहे. त्यात केवळ 84 व्यक्तीचित्रणेच लेखकाने का निवडली? हे एक कोडं आहे. ते त्यांच्या पुढील आवृत्तीत उलगडू शकते. वडीलांची इच्छा साहित्यसेवेच्या माध्यमातून आनंदा पाटील यांनी पूर्ण केल्याचे समाधान वाटते. अवतीभवती असलेल्या दीपस्तंभांची ओळख या पुस्तकातून होते, असे राज्याचे निवडणूक आयुक्त वाघमारे यांनी आवर्जून नमूद केले.

सकारात्मक संदेश देणारे पुस्तक
‘उजेड पेरणारी माणसं’ हे पुस्तक विद्यार्थी, शिक्षकांनी संग्रही ठेवून वाचावं असे आहे. वंचित घटकांतील मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी धडपडणारी वैशाली झाल्टे, राजेश्री सुरवाडे, कॅरिबॅग निर्मूलन चळवळीत योगदान देणार्‍या शैलाताई सावंत, वामनदादा कर्डक यांचा वैचारिक वसा चालवणारे भीमशाहीर प्रतापसिंग बोदडे, दिलीप घोडेस्वार यांच्यासह विविध क्षेत्रात समर्पित भावनेने काम करणार्‍यांवर लिहिलेले लेख अभ्यासपूर्ण आहेत. प्रत्येकाने वाचावं असे हे पुस्तक आहे, असे अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे माजी सदस्य किशोर मेढे यांनी नमूद केले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !