भुसावळातील 21 वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृत्यू : वॉटर पार्कजवळ आढळला मृतदेह
भुसावळ (गुरुवार, 8 ऑक्टोबर 2026) : शहरातील शिवाजी नगर भागातील 21 वर्षीय तरुणाचा वरणगाव रोडवरील आलिशान वॉटर पार्कजवळ गुरुवारी सकाळी मृतदेह आढळल्याने शहरात मोठी खळबळ उडाली. या तरुणाचा नेमका मृत्यू कसा झाला? याबाबत अस्पष्टता असून शवविच्छेदन अहवालाअंती अधिक कारण स्पष्ट होणार आहे. सूत्रानुसार, तरुणाच्या डोक्याच्या मागील बाजूस गंभीर दुखापत झाल्यानंतर रक्तस्त्राव झाल्याचे दिसून आले. भूषण उल्हास वावरे (21, गोपाळ नगर, डी.एल.हिंदी विद्यालयामागे, भुसावळ) असे मृत तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी घेतली धाव
शहरातील वॉटर पार्कजवळ एका तरुणाचा मृतदेह पडून असल्याची माहिती नागरिकांकडून कळवण्यात आल्यानंतर बाजारपेठ पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. निरीक्षक राहुल वाघ, सहा.निरीक्षक शत्रूघ्न पाटील व फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळाची पाहणी केली. तरुण या परिसरातील नेमका केव्हा व कुणासोबत आला? त्याच्यासोबत काय घडले ? या बाबीची माहित सीसीटीव्ही फुटेजचीही तपासणीद्वारे संकलीत केली जात आहे.


