भुसावळमध्ये ‘मॉब डिस्पर्सल मॉक ड्रिल’
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची आपत्कालीन तयारी तपासली
भुसावळ (गुरुवार, 8 ऑक्टोबर 2026) : आगामी नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भुसावळ शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने गर्दी नियंत्रणाची प्रभावी रंगीत तालीम घेतली. नाटकर चौक, गवळीवाडा येथे गुरुवारी सकाळी 11 ते दुपारी 12.45 या वेळेत ‘मॉब डिस्पर्सल मॉक ड्रिल’ घेण्यात आले. या प्रात्यक्षिकात भुसावळ शहर, बाजारपेठ, भुसावळ तालुका आणि नशिराबाद पोलीस ठाण्यांतील 10 अधिकारी, 40 अंमलदार तसेच एक आरसीपी पथक सहभागी झाले. आपत्कालीन परिस्थितीत विविध यंत्रणांचा प्रतिसाद किती जलद आणि प्रभावी राहतो, याची प्रत्यक्ष चाचणी यावेळी घेण्यात आली.
नियंत्रण कक्षाला तत्काळ संदेश
ड्रिलदरम्यान नियंत्रण कक्षाला तात्काळ संदेश देण्यात आला. संबंधित पथकांच्या हालचाली तसेच घटनास्थळी पोहोचण्याच्या वेळेची अचूक नोंद करण्यात आली त्यामुळे प्रत्यक्ष आपत्कालीन परिस्थितीत पोलीस दलाची कार्यक्षमता आणि प्रतिसाद वेळ तपासणे शक्य झाले.
या मॉक ड्रिलमध्ये दंगल नियंत्रण पथक, कार्यकारी दंडाधिकारी, रुग्णवाहिका आणि अग्निशामक दल यांच्यात समन्वय साधून गर्दी नियंत्रणाचे प्रात्यक्षिक करण्यात आले. विशेषतः सण-उत्सवांच्या काळात मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी होत असल्याने अशा परिस्थितीत संभाव्य अनुचित घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाय योजनांची रंगीत तालीम घेण्यात आली. आपत्कालीन परिस्थितीत सर्व संबंधित यंत्रणांचा समन्वय, तत्परता आणि प्रतिसाद वेळ तपासण्याच्या दृष्टीने ही मॉक ड्रिल महत्त्वपूर्ण ठरली. आगामी नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भुसावळ शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असल्याचे या प्रात्यक्षिकातून स्पष्ट झाले.


