विद्यार्थिनींनी आरोग्याबाबत सजग रहावे : भुसावळात डॉ.आर.पी.फालक
भुसावळातील भोळे महाविद्यालयात विद्यार्थिनींची आरोग्य तपासणी
भुसावळ (गुरुवार, 8 ऑक्टोबर 2026) : विद्यार्थिनींनी शिक्षणासोबतच आपल्या आरोग्याकडेही गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक असून निरोगी शरीर आणि निरोगी मन हे सक्षम व आत्मविश्वासपूर्ण व्यक्तिमत्त्वाच्या विकासासाठी अत्यंत आवश्यक असल्याचे मत येथे प्राचार्य डॉ.आर.पी.फालक यांनी व्यक्त केले. दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात युवती सभा अंतर्गत ‘मिशन साहसी अभियान’ अंतर्गत ‘युवतींचे आरोग्य’ या विषयावर मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी प्राचार्य बोलत होते.
योग्य वेळी तज्ज्ञांचा सल्ला घ्या
नियमित आरोग्य तपासणी, संतुलित आहार, पुरेशी विश्रांती, स्वच्छता आणि आरोग्यदायी जीवनशैली यांचा दैनंदिन जीवनात अवलंब करावा, असे आवाहन प्राचार्यांनी केले. आरोग्याशी संबंधित कोणतीही समस्या जाणवल्यास तिच्याकडे दुर्लक्ष न करता योग्य वेळी तज्ज्ञांचा सल्ला घेणे महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. प्रमुख मार्गदर्शक डॉ. नृपाली सावकारे यांनी युवतींच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या दैनंदिन आरोग्यविषयक सवयी, संतुलित आहार, वैयक्तिक स्वच्छता, नियमित आरोग्य तपासणी आणि आरोग्यविषयक समस्यांबाबत जागरूकता याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी प्रा.डॉ.संजय चौधरी, प्रा.संगीता धर्माधिकारी उपस्थित होत्या.
55 विद्यार्थिनींची रक्त तपासणी
महाविद्यालयातील विद्यार्थिनींसाठी रक्त तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात एकूण 55 विद्यार्थिनींची रक्त तपासणी करण्यात आली. सूत्रसंचालन प्रा.माधुरी पाटील तर आभार प्रा. संगीता धर्माधिकारी यांनी मानले. प्रा.डॉ.एस.डी.चौधरी, प्रा.डॉ.अंजली पाटील, प्रा.सुशीला भाटे यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.


