शिक्षणाबरोबर संस्कार आणि संस्कृती टिकवणे महत्त्वाचे : आमदार नंदकिशोर महाजन
भुसावळ (गुरुवार, 8 ऑक्टोबर 2026) : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणासोबतच त्यांच्या मनावर संस्कार रुजविणे आणि संस्कृतीचे जतन करणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन जळगाव मतदारसंघाचे विधानपरिषद सदस्य आमदार नंदकिशोर महाजन यांनी केले. शहरातील श्री संत ज्ञानेश्वर शिक्षण मंडळाच्या वतीने आयोजित वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष सोनूभाऊ मांडे होते. संस्थेच्या तिन्ही शाळांतील गुणवंत विद्यार्थ्यांना विविध पारितोषिके देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
विद्यार्थ्याने क्षमता व आवड ओळखणे गरजेचे
आमदार महाजन म्हणाले, जगात यशस्वीपणे टिकून राहण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्यातील क्षमता आणि आवड ओळखणे आवश्यक आहे. ज्या क्षेत्रात आपण उल्लेखनीय कामगिरी करू शकतो, त्या क्षेत्राची निवड करून सातत्याने मेहनत घेतल्यास निश्चितच मोठे यश मिळवता येते. संस्थेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या विविध गुणांना वाव दिला जात असल्याबद्दल त्यांनी संस्थेचे कौतुक केले. यावेळी राज्यस्तरीय बालनाट्य स्पर्धेत पारितोषिक मिळविणार्या विद्यार्थी कलावंत तसेच शिक्षकांचा सुद्धा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
विद्यार्थ्यांना सांगितल्या प्रेरणादायी यशकथा
सोनूभाऊ मांडे यांनीही विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले. त्यांनी पायलट स्मित मच्छार तसेच आशियाई क्रीडा स्पर्धेत तिरंदाजीमध्ये सुवर्णपदक पटकाविणार्या कुमकुम मोहोळ यांच्या प्रेरणादायी यशकथा विद्यार्थ्यांना सांगितल्या. संस्कारांमुळे व्यक्तिमत्त्वाची जडण-घडण होते, तर सातत्यपूर्ण अभ्यास व मेहनतीमुळे मोठे यश संपादन करता येते, असे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक अहिल्यादेवी कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मानसी कुलकर्णी यांनी केले. संस्थेचा अहवाल पर्यवेक्षक नारायण घोडके यांनी सादर केला. विनोद उबाळे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. बक्षीसपात्र विद्यार्थ्यांची यादी मनीषा राजपूत, सरीता चौधरी, दीपाली भट यांनी वाचली.
व्यासपीठावर यांची होती उपस्थिती
व्यासपीठावर संस्थेचे सदस्य श्रीधर खनके, सुरेशराव वैद्य, राजेंद्र कुलकर्णी तसेच मुख्याध्यापक प्रकाश चौधरी, मानसी कुलकर्णी, अलका सुरवाडे उपस्थित होते. सूत्रसंचालन योगिता पाटील यांनी तर आभार मुख्याध्यापिका अलका सुरवाडे यांनी मानले. यशस्वीतेसाठी संस्थेच्या तिन्ही शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी सहकार्य केले. कार्यक्रमास विद्यार्थी, पालक व संस्थेचे दाते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


