भुसावळ पुन्हा खुनाने हादरले : उसनवारीच्या पैश्यांच्या वादातून तरुणाचा खून
दोघांना अटक, तिसरा संशयीत पसार : फार्म हाऊसमध्ये तरुणाला मारहाण करीत मृतदेह वॉटर पार्कसमोरील सर्व्हिस रोडवर फेकला
गणेश वाघ
भुसावळ (गुरुवार, 8 ऑक्टोबर 2026) : उसनवारीच्या व्यवहारातून शहरातील उच्च शिक्षीत 21 वर्षीय तरुणाचा खून करण्यात आल्याची घटना गुरुवार, 8 रोजी समोर आल्यानंतर शहरात मोठी खळबळ उडाली आहे. संशयीतांनी खुनाचे प्रकरण अंगाशी येवू नये म्हणून मृतदेह महामार्गावरील वॉटर पार्कजवळील सर्व्हिस रोडवर फेकला मात्र तांत्रिक तपासाद्वारे पोलिसांनी खुनाचा प्रकार समोर आणत दोन आरोपींना अटक केली. भूषण उल्हास व्हावळे (21, गोपाळ नगर, डी.एल.हिंदी हायस्कूलमागे, भुसावळ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे तर खून प्रकरणी संजय दत्तू आवटे व प्रमोद बलराम लाहोरीया (दोन्ही रा.भुसावळ) यांना अटक करण्यात आली असून तिसरा संशयीत रफिक मेमन उर्फ गुड्डू पसार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
फार्म हाऊसवर बोलावून केला खून
बाजारपेठ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भूषण उल्हास व्हावळे (21) या तरुणाला संशयीत आरोपींनी साक्री फाटा परिसरातील संजय दत्तू आवटे यांच्या फार्म हाऊसवर नेले व उसनवारीचे पैसे परत न केल्याच्या कारणावरून त्याच्याशी वाद झाला. या वादातून आरोपींनी कोणत्यातरी हत्याराने भूषण याच्यावर मारहाण करून गंभीर जखमी करीत ठार मारले. प्रकरण अंगाशी नको म्हणून मृतदेह महामार्गावरील वॉटर पार्कजवळील सर्व्हिस रस्त्यावर टाकला.
तिघांविरोधात खुनाचा गुन्हा
मयताचा भाऊ विशाल उल्हास व्हावळे भुसावळ बाजारपेठ पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून संजय दत्तू आवटे व प्रमोद बलराम लाहोरीया, (दोन्ही रा.भुसावळ), रफिक मेमन उर्फ गुड्डू विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
दोघा आरोपींना अटक
संशयीत पसार होण्याच्या प्रयत्नात असताना बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या नेतृत्वात पथकाने संजय दत्तू आवटे व प्रमोद बलराम लाहोरिया या आरोपींना अटक केली तर अफसर रफिक मेमन ऊर्फ गुड्डू याचा शोध सुरू केला आहे.
यांनी केली कारवाई
ही कारवाई जळगावचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गवित, उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या नेतृत्वात सहा.निरीक्षक राहुल तायडे, सहा.शत्रृघ्न पाटील, पोलीस उपनिरीक्षक मो.अली सैय्यद, डी.बी. पथकातील हवालदार कांतीलाल केदारे, योगेश माळी, भूषण चौधरी, प्रशांत सोनार, सचिन चौधरी, महेंद्र पाटील, चंद्रकांत रायपूरकर, जावेद शहा, जीवन कापडे, अशोक बाविस्कर आदींनी आरोपींना खुनाच्या घटनेनंतर अवघ्या दोन तासात अटक केली.


