भुसावळात तालुकास्तरीय मैदानी स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद
प्रथम व द्वितीय क्रमांकाच्या खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड
भुसावळ (गुरुवार, 8 ऑक्टोबर 2026) : सेवा संकल्प अभियानांतर्गत क्रीडा व युवा सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद, जळगाव, पंचायत समिती भुसावळ आणि भुसावळ नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शासकीय शालेय तालुकास्तरीय मैदानी स्पर्धा बियाणी मिलिटरी स्कूलच्या मैदानावर उत्साहात पार पडल्या.
स्पर्धेत भुसावळ तालुक्यातील विविध शाळांमधील 14, 17 व 19 वर्षांखालील मुला-मुलींनी सहभाग घेतला. धावणे, अडथळा शर्यत, लांब उडी, उंच उडी, गोळाफेक, थाळीफेक, हातोडाफेक, चालणे आणि 4100 मीटर रिले अशा विविध प्रकारांत खेळाडूंनी कौशल्याचे प्रदर्शन केले.
यांची होती उपस्थिती
मुलांच्या स्पर्धांचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्याहस्ते झाले. यावेळी गटविकास अधिकारी डॉ. कुलदीप ठाकरे, तालुका क्रीडा अधिकारी डॉ.नितीन जंगम, संस्थाध्यक्ष मनोज बियाणी, सचिव डॉ.संगीता बियाणी उपस्थित होत्या.
उद्घाटन भुसावळ नगरपरिषदेच्या प्रभारी नगराध्यक्ष शैलेजा नारखेडे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी बियाणी एज्युकेशन संस्थेच्या सचिव डॉ.संगीता बियाणी, संचालिका स्मिता बियाणी, प्राचार्य डी. एम. पाटील, महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष डॉ.प्रदीप साखरे यांच्यासह क्रीडा शिक्षक, पंच, शिक्षक व स्वयंसेवक उपस्थित होते. उद्घाटनानंतर 100 मीटर धावण्याची स्पर्धा घेण्यात आली.
खेळातून शिस्त व आत्मविश्वासाची जडणघडण
उद्घाटनप्रसंगी संजय सावकारे यांनी विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात खेळाचे महत्त्व अधोरेखित केले. खेळामुळे सांघिक भावना, आत्मविश्वास व शारीरिक तंदुरुस्ती वाढते. विद्यार्थ्यांनी मेहनत, सातत्य व शिस्तीला प्राधान्य देण्यासोबतच स्वच्छतेची काळजी घ्यावी आणि मोबाईलच्या अतिवापरापासून दूर राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
शैलेजा नारखेडे यांनी खेळाडूंना शुभेच्छा देत खेळाकडे करिअरची संधी म्हणून पाहावे आणि आरोग्यासाठी नियमित खेळावे, असे सांगितले.
प्रथम, द्वितीय क्रमांकाच्या खेळाडूंची जिल्ह्यासाठी निवड
विविध क्रीडा प्रकारांमध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविणार्या खेळाडूंचा गौरव करण्यात आला. तालुकास्तरीय स्पर्धेत प्रथम व द्वितीय क्रमांक मिळविणार्या खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. त्यामुळे निवड झालेल्या खेळाडूंना आता जिल्हास्तरावर आपल्या कामगिरीची संधी मिळणार आहे.
पंच, शिक्षक व स्वयंसेवकांचे नियोजन
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी क्रीडा शिक्षक, पंच, आयोजक, शिक्षक व स्वयंसेवकांनी नियोजनबद्ध पद्धतीने काम केले. मैदान व्यवस्था, खेळाडूंची नोंदणी, स्पर्धांचे आयोजन, पंचांचे कामकाज आणि निकाल प्रक्रिया सुरळीतपणे पार पडल्याने स्पर्धा शिस्तबद्ध वातावरणात संपन्न झाल्या.
तालुकास्तरीय स्पर्धेत खेळाडूंनी केलेल्या कामगिरीमुळे भुसावळच्या क्रीडा क्षेत्रातील गुणवत्तेला पुन्हा एकदा व्यासपीठ मिळाले असून, जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा व्यक्त होत आहे. आभार विलास पाटील यांनी मानले.


