ट्रॅक्टरला कार धडकली : अपघातानंतर सहा लाखांचा गुटखा निंभोरा पोलिसांकडून जप्त
छत्रपती संभाजीनगरातील दोघांना अटक : पुरवठादाराचा पोलिसांकडून शोध
निंभोरा, ता.रावेर (गुरुवार, 8 ऑक्टोबर 2026) : निंभोर्यानजीक गुटखा वाहून नेणार्या वाहनाने ट्रॅक्टरला मागून धडक दिल्याने अपघात घडून दोघे जखमी झाले होते. अपघातग्रस्त वाहनात गुटखा असल्याची माहिती मिळाल्यानंतर निंभोरा पोलिसांनी धाव घेत अन्न व औषध प्रशासन विभागाला सूचना केली. वाहनाच्या तपासणीत तब्बल पाच लाख 90 हजार 440 रुपयांचा गुटखा आढळल्याने तो जप्त करण्यात आला तर एक लाख 80 हजार रुपये किंमतीचे अपघातग्रस्त वाहन जप्त करण्यात आले. वाहन चालक अजीम तैय्यब सय्यद (23, रा.गारखेडा परिसर, धरतीधन सोसायटी, इंदिरा नगर क्रांती चौक, छत्रपती संभाजीनगर) व शेख मुदस्सीर कासीम (23, रा.इंदिरा नगर, गारखेडा, आलमगीर मशिदीजवळ, छत्रपती संभाजीनगर) यांना अटक करण्यात आली.
ट्रॅक्टरवर धडकले वाहन
बुधवार, 7 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी सुमारे 5.45 वाजता निंभोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बडगाव फाट्याजवळ, ता. रावेर येथे एका चारचाकी वाहनाचा सोनालिका कंपनीच्या निळ्या रंगाच्या ट्रॅक्टरला मागून धडक देऊन अपघात झाला. अपघातात वाहनातील दोघे किरकोळ जखमी झाल्याने त्यांना उपचारार्थ हलवण्यात आले तर वाहनात मोठ्या प्रमाणावर गुटखा असल्याची माहिती वार्यासारखी पसरताच निंभोरा पोलीस ठाण्याच्या सहा.निरीक्षक मीरा देशमुख, पोलीस उपनिरीक्षक अभय ढाकणे तसेच पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. अपघातग्रस्त वाहनाची तपासणी केली असता ते ह्युंदाई कंपनीची आय-20 कार (क्रमांक एम.एच.26 व्ही.4423) मध्ये राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा व पानमसाला दिसून आल्यानंतर हे वाहन निंभोरा पोलीस ठाण्यात आणून पंचांसमक्ष त्याची झडती घेण्यात आली.
पाच लाख 90 हजारांचा गुटखा जप्त
वाहनात पाच लाख 90 हजार 440 रुपये किंमतीचा राज्यात प्रतिबंधीत गुटखा तर एक लाख 80 हजार रुपये किंमतीचे वाहन मिळून सात लाख 70 हजार 440 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींविरोधात निंभोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, पोलीस उपअधीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली निंभोरा पोलीस ठाण्याच्या सहा.पोलीस निरीक्षक मीरा देशमुख यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक ढाकणे, पोलीस कर्मचारी सतीश सानप, किरण जाधव, महेंद्र महाजन, परेश सोनवणे, प्रशांत चौधरी, अमोल वाघ, सरफराज तडवी आदींच्या पथकाने केली.


