शेती साहित्य चोरणारे समजून खेकडे पकडणार्यांना मारहाण : सहा जणांविरोधात गुन्हा
भुसावळ (शुक्रवार, 9 ऑक्टोबर 2026) : हतनूर येथील तापी नदीपात्रात खेकडे पकडणार्या सहा जणांना शेती साहित्याची चोरी करणारे चोरटे समजून संतप्त जमावाने मारहाण केली. चोरटे पकडल्याची अफवा पसरल्याने शेकडो शेतकरी वरणगाव पोलीस ठाण्याच्या परिसरात जमा झाले व त्यांनी संशयितांना आमच्या ताब्यात द्या आणि त्यांच्यावर कढक कारवाई करा, अशी आक्रमक मागणी करत त्यांनी ठाण्याबाहेरच ठिय्या मांडला. पोलिसांनी या प्रकरणी अखेर सहा संशयीतांविरोधात गुन्हा दाखल केला.
काय आहे प्रकरण
कठोरा खुर्द येथील शेतकरी नारायण वासुदेव पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या शेतातील 10 एचपी क्षमतेच्या मोटारीमधील कॉपर वायर चोरीस गेली. याशिवाय परिसरातील ज्ञानदेव पाटील, अशोक पाटील, संजय राणे, देविदास पाटील, शरद राणे, प्रमोद पाटील आणि पंढरी पाटील अशा एकूण आठ शेतकर्यांच्या मोटारी फोडून चोरट्यांनी सुमारे 59 हजार रुपयांची कॉपर वायर लांबवली. बुधवारी सायंकाळी हतनूर येथे सहजण खेकडे पकडत होते. ते चोर असल्याच्या संशयातून काही शेतकर्यांनी त्यांना मारहाण केली. ही माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सहा जणांना ताब्यात घेतले.
पोलीस अधिकार्यांची धाव
संतप्त जमाव पोलीस ठाण्यावर जमा झाल्याने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जळगावचे अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, भुसावळचे डीवायएसपी केदार बारबोले, फैजपूरचे डीवायएसपी अनिल बडगुजर, मुक्ताईनगरचे पीआय आशिषकुमार आडसूळ, बोदवड व सावा येथील पोलिस अधिकारी व कर्मचारी शहरात दाखल झाले.
सहा जणांवर गुन्हा दाखल
घटनेचे गांभीर्य ओळखून मंत्री संजय सावकारे यांनी रात्री पोलीस ठाण्यात भेट देऊन परिस्थितीची पाहणी करीत शांतता राखण्याचे आवाहन केले. पोलिसांनी चोरट्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर रात्री सुमारे 11 वाजता जमाव शांत झाला. या प्रकरणी नारायण वासुदेव पाटील यांच्या तक्रारीवरून अजय भील, शिवा भील, नितेश भोल, भोला भील, अशोक भील आणि धर्मेंद्र भील (सर्व रा. दसनूर, ता.रावेर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास वरणगावचे सहा.पोलीस निरीक्षक अमितकुमार बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.


