29 लाखांच्या वादातून भुसावळात उच्च शिक्षित तरुणाचा जीव घेतला ; दोघा संशयीतांना अटक

आधी फार्म हाऊसवर बोलावून तरुणाला केली बेदम मारहाण ; मृत्यू होताच मृतदेह सर्व्हिस रोडवर फेकला : आईसोबतचा कॉल ठरला अखेरचा !


भुसावळ (शुक्रवार, 9 ऑक्टोबर 2026) : उसनवार दिलेले 29 लाख रुपये परत न केल्याच्या वादातून शहरातील उच्च शिक्षीत 21 वर्षीय तरुणाचा खून करण्यात आल्याची संतापजनक घटना गुरुवार, 8 रोजी समोर आल्यानंतर शहरात मोठी खळबळ उडाली आहे. संशयीतांनी खुनाचे प्रकरण अंगाशी येवू नये म्हणून मृतदेह महामार्गावरील वॉटर पार्कजवळील सर्व्हिस रोडवर फेकला मात्र तांत्रिक तपासाद्वारे पोलिसांनी खुनाचा प्रकार समोर आणत दोन आरोपींना अटक केली. भूषण उल्हास व्हावळे (21, गोपाळ नगर, डी.एल.हिंदी हायस्कूलमागे, भुसावळ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे तर खून प्रकरणी संजय दत्तू आवटे व प्रमोद बलराम लाहोरीया (दोन्ही रा.भुसावळ) यांना अटक करण्यात आली असून तिसरा संशयीत रफिक मेमन उर्फ गुड्डू पसार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

अशी घडली खुनाची घटना
मयताचा भाऊ विशाल उल्हास व्हावले (25, गोपाळ नगर, भुसावळ) यांनी याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, ते एमपीएससीचा अभ्यास करतात व रेल्वेतील सेवानिवृत्त वडील उल्हास, आई उषा व लहान भाऊ भूषण सोबत वास्तव्यास आहेत. बुधवार, 7 रोजी लहान भाऊ भूषण यास कुणाचेतरी फोन येत असल्याने तो आई त्याच्यासोबत बाहेर गेला व सायंकाळी पाच वाजून सात वाजेच्या सुमारास आईने भूषणच्या मोबाईलवरून वडिलांना फोन करून आम्ही संजय आवटे यांच्या फार्म हाऊसवर असल्याचे सांगितले व तेथे येण्यास सांगितले. तेथे गेल्यानंतर संशयीत संजय आवटेसोबत दोघे खुर्चीवर बसून होते व भूषणही पत्र्याच्या शेडखाली बसून होता. संशयीत संजय आवटे याने तुमच्या मुलाने माझ्याकडून 34 लाख रुपये उसनवार घेतले असून त्यातील पाच लाख रुपये परत केले असून 29 लाख रुपये भूषणकडे बाकी आहेत व ते मला परत आणून द्या. यावेळी संबंधिताना पैसे आणून देतो, भूषणला सोडा, असे सांगूनही त्यास सोडण्यात आले नाही. सायंकाळी पावणेसात वाजता आई-वडील व तक्रारदार विशाल घरी परतले मात्र भूषणला तेथेच ठेवण्यात आले.

रात्री मुलाशी अखेरचे बोलणे
बुधवारी रात्री 9.46 वाजता भूषणने वडिलांना फोन करून पैसे जमले का ? याबाबत विचारणा केली व तेव्हा आईने पैसे जमवत असल्याचे सांगितले. त्यानंतर रात्री 10.32 वाजता आईने पुन्हा भूषणला फोन केला असता त्याने उचलला नाही. गुरुवारी सकाळी आठ वाजता कुटूंब पैसे जमवण्यासाठी मावशीकडे गेल्यानंतर सकाळी पावणेदहा वाजता वडिलांनी फोन करून घरी पोलीस आल्याची व मुलाच्या मृत्यूची माहिती दिली.

खून करून मृतदेह फेकला
भूषण उल्हास व्हावळे (21) या तरुणाला संशयीत आरोपींनी साक्री फाटा परिसरातील संजय दत्तू आवटे यांच्या फार्म हाऊसवर नेले व उसनवारीचे पैसे परत न केल्याच्या कारणावरून त्याच्याशी वाद झाला. या वादातून आरोपींनी कोणत्यातरी हत्याराने भूषण याच्यावर मारहाण करून गंभीर जखमी करीत ठार मारले. प्रकरण अंगाशी नको म्हणून मृतदेह महामार्गावरील वॉटर पार्कजवळील सर्व्हिस रस्त्यावर टाकल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

दोन तासात खुनाची उकल : दोघांना अटक
मयताचा भाऊ विशाल उल्हास व्हावळे भुसावळ बाजारपेठ पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून संजय दत्तू आवटे व प्रमोद बलराम लाहोरीया, (दोन्ही रा.भुसावळ), रफिक मेमन उर्फ गुड्डू विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. संशयीत पसार होण्याच्या प्रयत्नात असताना बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या नेतृत्वात पथकाने संजय दत्तू आवटे व प्रमोद बलराम लाहोरिया या आरोपींना अटक केली तर अफसर रफिक मेमन ऊर्फ गुड्डू याचा शोध सुरू केला आहे. अवघ्या दोन तासात आरोपींना अटक करण्यात यंत्रणेला यश आले. अटकेतील संजय आवटे हे भुसावळातील भाजपाचे नगरसेवक राजेंद्र आवटे यांचे बंधू आहेत.

यांनी केली कारवाई
ही कारवाई जळगावचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गवित, उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या नेतृत्वात सहा.निरीक्षक राहुल तायडे, सहा.शत्रृघ्न पाटील, पोलीस उपनिरीक्षक मो.अली सैय्यद, डी.बी. पथकातील हवालदार कांतीलाल केदारे, योगेश माळी, भूषण चौधरी, प्रशांत सोनार, सचिन चौधरी, महेंद्र पाटील, चंद्रकांत रायपूरकर, जावेद शहा, जीवन कापडे, अशोक बाविस्कर आदींनी केली.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !