50 हजारांचे बक्षीस असलेल्या युपीतील अट्टल घरफोड्याला भुसावळात बेड्या
घोडेपीर बाबा दर्ग्याजवळ गुन्हे शाखेसह बाजारपेठ पोलिसांची कारवाई
भुसावळ (शनिवार, 10 ऑक्टोबर 2026) : उत्तर प्रदेशातील मुंढापाण्डे पोलीस ठाण्याच्या हद्दीत सन 2020 मध्ये झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्यात पसार असलेल्या व विविध गुन्ह्यात वॉण्टेड असलेल्या आरोपीच्या भुसावळ बाजारपेठ पोलिसांसह गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्त कारवाईत मुसक्या बांधल्या. ही कारवाई शुक्रवार, 9 रोजी करण्यात आली. ईरफान उर्फ पूरबिया हामीद (लालूवाला, भोजपूर, जनपद, मुरादाबाद) असे अटकेतील आरोपीचे नाव असून त्याच्यावर तब्बल 50 हजारांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.
गोपनीय माहितीवरून कारवाई
उत्तरप्रदेश राज्यातील मुंढापाण्डे पोलीस ठाण्याच्या हद्दीत 2020 मध्ये झालेल्या घरफोडीत ईरफान उर्फ पूरबिया हामीद (लालूवाला, भोजपूर, जनपद, मुरादाबाद) या संशयीताचे नाव समोर आल्यानंतर तो पसार झाला होता. आरोपीचा सर्वदूर शोध घेवूनही तो गवसत नसल्याने त्याच्यावर मुरादाबाद परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक मुनीराज जी.यांनी 50 हजारांचे बक्षीस जाहीर केले होते.
भुसावळात ठावठिकाणा मिळताच कारवाई
आरोपी ईरफानचे लोकेशन भुसावळातील घोडेपीर बाबा दर्गा परिसरात आल्यानंतर युपी पोलिसांना यंत्रणेला माहिती दिल्यानंतर गुन्हे शाखा व बाजारपेठ पोलिसांच्या पथकाने आरोपीला शुक्रवारी अटक करीत युपी पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलीस उपअधीक्षक केदार बारबोले, बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल वाघ व गुन्हे शाखेचे निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचार्यांनी ही कारवाई केली.


