भुसावळातील भोळे महाविद्यालयात ‘मिशन साहसी’ अभियानातून युवतींना स्वसंरक्षणाचे धडे
लाठी-काठी, भालाफेक व तलवारबाजीचे प्रशिक्षण ; 50 विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त सहभाग
भुसावळ (शनिवार, 10 ऑक्टोबर 2026) : युवतींमध्ये आत्मविश्वास, धैर्य आणि स्वसंरक्षणाची भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात युवती सभा अंतर्गत ‘मिशन साहसी अभियान’ राबविण्यात आले. या अभियानांतर्गत विद्यार्थिनींना लाठी-काठी, भालाफेक तसेच तलवारबाजीचे प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणात 50 विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
प्रसंगावधान होते विकसीत
नयना चौधरी यांनी प्रशिक्षणाचा उद्देश स्पष्ट केला. विद्यार्थिनींनी शिक्षणासोबतच स्वसंरक्षणाची कौशल्ये आत्मसात करणे आवश्यक असून, अशा प्रशिक्षणातून त्यांच्यात धैर्य, आत्मविश्वास आणि प्रसंगावधान विकसित होते, असे त्यांनी सांगितले.
स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण घेणे ही काळाची गरज
प्राचार्य डॉ.आर.पी.फालक म्हणाले की, सध्याच्या काळात युवतींनी स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण घेणे ही काळाची गरज आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थिनींचा आत्मविश्वास वाढून त्या कोणत्याही आव्हानाला धैर्याने सामोरे जाण्यास सक्षम होतील.
प्रशिक्षणादरम्यान प्राजक्ता चौधरी यांनी लाठी-काठीचे विविध डावपेच, भालाफेकीचे तंत्र तसेच तलवारबाजीतील प्राथमिक कौशल्यांची प्रात्यक्षिके सादर केली. विद्यार्थिनींनी उत्स्फूर्तपणे प्रशिक्षणात सहभागी होत विविध स्वसंरक्षण कौशल्यांचा सराव केला.
यांची होती उपस्थिती
‘मिशन साहसी अभियान’च्या माध्यमातून युवतींना सक्षम, आत्मनिर्भर आणि आत्मविश्वासपूर्ण बनविण्याचा प्रयत्न करण्यात आला. या उपक्रमामुळे विद्यार्थिनींमध्ये साहस, शिस्त, एकाग्रता, प्रसंगावधान आणि स्वसंरक्षणाविषयी जागरूकता निर्माण होण्यास मदत झाली.
कार्यक्रमाला महाविद्यालयाच्या युवती सभा सचिव प्रा.संगीता धर्माधिकारी, सदस्या प्रा.डॉ.अंजली पाटील, प्रा.डॉ.माधुरी पाटील, महाविद्यालयातील विद्यार्थिनी उपस्थित होत्या.


