फैजपूर-हंबर्डी रस्त्यावर ट्रकच्या धडकेने अंजाळेतील 12 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, पिता गंभीर जखमी

फैजपूर पोलिसात ट्रक चालकासह कन्स्ट्रक्शन कंपनीच्या मालकासह अभियंत्याविरोधात गुन्हा


फैजपूर (शनिवार, 10 ऑक्टोबर 2026) : रस्त्याचे काम करताना नियम पायदळी बसवल्याने विरुद्ध दिशेने आलेल्या ट्रकने दुचाकीला धडक दिल्यानंतर झालेल्या अपघातात अंजाळेतील 12 वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला तर त्याचे वडील गंभीर जखमी झाले. हा अपघात फैजपूर-हंबर्डी रस्त्यावर शुक्रवार, 9 रोजी रात्री सात वाजेच्या सुमारास घडला.या प्रकरणी ट्रक चालकासह रस्त्याचे काम करणार्‍या कन्स्ट्रक्शन कंपनीचा मालक व अभियंत्याविरोधात फैजपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. सलील कविराज चव्हाण (12, नेपानगर, ता.बर्‍हाणपूर, ह.मु.अंजाळा, ता.यावल, जि.जळगाव) असे मृत बालकाचे नाव आहे.

पित्यासह जाणार्‍या चिमुकल्याला ट्रकने उडवले
पोलिसांच्या माहितीनुसार मयत सलील हा पिता कविराज बारक्या चव्हाण यांच्यासह शुक्रवारी रात्री दुचाकी (एम.पी.68 एम.एच.9894) ने फैजपूरकडून अंजाळा येथे गावाकडे निघाल्यानंतर हंबर्डी गावापासून दिड किलोमीटर अंतरावर अज्ञात ट्रकने विरूद्ध दिशेला येत दुचाकीला धडक दिल्याने त्यात चिमुकल्या सलीलचा मृत्यू ओढवला तर त्याचे वडील कविराज हे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर ट्रक चालक वाहनासह पसार झाला.

कन्स्ट्रक्शन कंपनीची बेपर्वाई
अपघात स्थळी रस्त्याचे काम सुरू असून ओम कंपनीने नियम न पाळल्याने, आवश्यक ती खबरदारी न न घेतल्याने व मानवी जीवन व इतरांच्या वैयक्तिक सुरक्षेला धोका निर्माण होईल, अशी कृती केल्याने हा अपघात घडल्याने अज्ञात ट्रक चालकासह ओम कंपनीचा मालक ओम कटरे, संबंधित रस्त्याचे काम पाहणारा अभियंता यांच्याविरोधात अर्जुन मुलसिंग बारेला (25, मांडवा, ता.झिरण्या, जि.खरगोण, मध्यप्रदेश, ह.मु.अंजाळा) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार देवेंद्र पाटील करीत आहेत.

रस्त्याच्या कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
अपघातस्थळी रस्त्याचे काम सुरू असताना आवश्यक खबरदारी आणि सुरक्षिततेच्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष करणयात आल्यानेच अपघात घडला व निष्पाप मुलाचा मृत्यू झाला. रस्त्याचे काम सुरू असताना वाहतूक व्यवस्थापन, धोक्याच्या सूचना, बॅरिकेड्स आणि आवश्यक सुरक्षा उपाययोजना योग्य प्रकारे केल्या जातात का? हा प्रश्न या घटनेनिमित्ताने उपस्थित झाला आहे. अपघाताची सखोल चौकशी करून दोषींवर कायदेशीर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !