रेल्वे सुरक्षा बलाची मोठी कारवाई : भुसावळसह पाचोर्‍यात रेल्वेच्या ई-तिकिटांचा काळाबाजार उघड

पाचोर्‍यात 49 हजार 800 रुपयांची तर भुसावळात 47 हजारांची तिकीटे जप्त


भुसावळ (रविवार, 11 ऑक्टोबर 2026) : आगामी सण-उत्सवाच्या अनुषंगाने रेल्वे गाड्यांना वाढलेल्या गर्दीनंतर रेल्वे तिकीटांची ब्लॅकमध्ये विक्री करणारे एजंटही सक्रिय झाले आहेत. भुसावळसह पाचोर्‍यात रेल्वे सुरक्षा बलाने या अनुषंगाने दोघांवर कारवाई करीत 97 हजार 250 रुपयांची तिकीटे जप्त केल्याने अवैधरित्या तिकीट विक्री करणार्‍यांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली.

पाचोर्‍यात वैयक्तिक यूजर आयडीवरून तिकिटांची विक्री
पाचोर्‍यात संशयास्पद यूजर आयडीच्या माहितीच्या आधारे पाचोरा येथील आरपीएफ चौकीने तपास सुरू केला. उपनिरीक्षक रोहिताश कुमार यांनी 8 ऑक्टोबर रोजी संशयित विनायक बापू वाघ (36, रा. नाथ मंदिराजवळ, जारगाव, ता. पाचोरा, जि. जळगाव) यास ताब्यात घेतल्यानंतर त्याने वैयक्तिक यूजर आयडींचा वापर करून रेल्वेची आरक्षित ई-तिकिटे उपलब्ध करून दिल्याची माहिती तपासात समोर आली. तिकिटांच्या मूळ भाड्याव्यतिरिक्त प्रत्येक प्रवाशाकडून 50 ते 100 रुपये अधिक घेतल्याची कबुली त्याने दिल्याचे आरपीएफच्या कारवाईविषयक नोंदीत नमूद आहे, संशयीतांकडून विविध ठिकाणच्या प्रवासाची 49 हजार 800 रुपयांची 38 तिकिटे जप्त करण्यात आली. त्यात भविष्यातील प्रवासासाठी आरक्षित असलेली 22 तिकिटे तसेच मागील प्रवासाची 16 तिकिटे असून या सर्व तिकिटांची एकत्रीत किंमत 49 हजार 800 रुपये 10 पैसे आहे. संशयीताचा मोबाईलही जप्त करण्यात आला. विनायक बापू वाघ याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास उपनिरीक्षक रोहिताश कुमार करीत आहेत.

भुसावळातील संशयीत ताब्यात : 47 हजारांचे रेल्वे ई-तिकीट जप्त
रेल्वे आरक्षित ई-तिकिटांचा अवैध व्यवसाय करणार्‍या भुसावळातील मोहम्मद अयाज मोहम्मद फारुख (44) याच्याकडून एकूण 47 हजार 450 रुपये 95 पैसे किंमतीची 26 रेल्वे ई-तिकिटे जप्त करण्यात आली. संशयीताविरोधात शुक्रवार, 9 ऑक्टोबर रोजी जळगाव आरपीएफ ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पाच यूजर आयडींचा वापर
मुख्यालयाकडून प्राप्त इनपुट क्रमांक 836/2026 अंतर्गत मिळालेल्या माहितीच्या आधारे जळगाव आरपीएफ पथकाने संबंधित व्यक्तीची चौकशी केली. चौकशीदरम्यान तो आपल्या रिअलमी कंपनीच्या सी-3 मॉडेलच्या मोबाईलवरून आयआरसीटीसीच्या वेबसाईटचा वापर करून रेल्वे आरक्षणाची ई-तिकिटे काढत असल्याचे समोर आले. यासाठी त्याने पाच वैयक्तिक यूजर आयडींचा वापर केल्याची माहिती तपासात पुढे आली. भविष्यातील प्रवासासाठीची 24 ई-तिकिटे तसेच पूर्वीच्या प्रवासाची दोन ई-तिकिटे मिळून एकूण किंमत 47 हजार 450 रुपये 95 पैसे असल्याचे नमूद करण्यात आले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !