भुसावळ उपविभागात ‘ऑपरेशन ऑल आउट’ : ‘जंक्शन’मधील तरुण तलवारीसह जाळ्यात ; गावठी दारू भट्ट्यांसह जुगार अड्ड्यांवर कारवाईची संक्रांत

333 लिटर हातभट्टी दारू जप्त ; वाहतूक नियम भंगातून 72 हजार 900 रुपयांचा दंड वसुल


गणेश वाघ
भुसावळ (रविवार, 11 ऑक्टोबर 2026) : भुसावळ शहरासह विभागातील गुन्हेगारीला चाप लावण्यासाठी भुसावळ उपविभागात शनिवार, 10 ऑक्टोबर रोजी ‘ऑपरेशन ऑल आउट’ विशेष मोहिम राबवण्यात आली. यावेळी विविध अवैध धंद्यांविरोधात व्यापक कारवाई करण्यात आल्याने गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली. भुसावळातील मुस्लीम कॉलनीतील 20 वर्षीय तरुणाला तलवारीसक अटक करण्यात आली तर विभागात हातभट्टी दारू, जुगार, अवैध अंमली पदार्थ, शस्त्र कायदा तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍यांविरुद्ध धडक कारवाई करण्यात आली.

भुसावळातील तरुणाकडे तलवार जप्त
शहरातील मुस्लीम कॉलनीतील मोहंम्मद राजीक मोहंम्मद (20) या तरुणाला रेल्वे स्टेशनजवळील पंधरा बंगला भागातून आठ इंच लांबीच्या तलवारीसह पकडण्यात आले. आरोपीविरोधात हवालदार भूषण चौधरीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.

हातभट्टी दारूच्या 12 कारवाया
पोलिसांच्या मोहिमेदरम्यान हातभट्टी दारू व संबंधित प्रकरणांत 12 गुन्हे दाखल करून 12 आरोपींवर कारवाई करण्यात आली. यावेळी एकूण 333 लिटर हातभट्टी दारू जप्त करण्यात आली. जप्त मुद्देमालाची किंमत 32 हजार रुपये आहे.

जुगार आणि अवैध अंमली पदार्थांवर कारवाई
जुगारविरोधी कारवाईत नऊ गुन्हे दाखल करून नऊ आरोपींवर कारवाई करण्यात आली. या प्रकरणां पाच हजार 940 रुपयांची रोकड जप्त करण्यात आली तसेच अवैध अंमली पदार्थांशी संबंधित तीन प्रकरणांत तीन आरोपींवर कारवाई करण्यात आली.

तंबाखू विक्री आणि सार्वजनिक ठिकाणांवरील नियमभंगावर लक्ष
कोप्टा कायद्यान्वये 29 प्रकरणांत कारवाई करण्यात आली. शाळेच्या 100 मीटर परिसरातील पानटपर्‍यांसंदर्भात पाच कारवाया करण्यात आल्या. महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाच्या कलम 84 अन्वये चार, कलम 65(ई) अन्वये एक, तर महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम 124 अन्वये एक कारवाई करण्यात आली.

वाहतूक नियमभंग करणार्‍यांना दंड
मोटार वाहन कायद्यान्वये एकूण 129 प्रकरणांत कारवाई करून 72 हजार 900 रुपयांचा दंड आकारण्यात आला. मद्यप्राशन करून वाहन चालविण्याच्या पाच प्रकरणांवरही कारवाई करण्यात आली.

आगामी काळातही अशाच पद्धत्तीने कारवाई : पोलीस उपअधीक्षक
भुसावळ उपविभागात कायदा व सुव्यवस्था राखणे, अवैध धंद्यांना आळा घालणे आणि वाहतूक नियमांचे पालन सुनिश्चित करणे या उद्देशाने ही विशेष मोहीम राबविण्यात आल्याचे भुसावळ विभागाचे पोलीस उपअधीक्षक केदार बारबोले यांनी सांगितले. विविध प्रकारच्या कारवायांमुळे अवैध व्यवसाय करणार्‍यांच्या गोटात मोठी खळबळ उडाली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !