विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसीत होण्यासाठी विज्ञान प्रदर्शनाची गरज ; रावेरात डॉ.गुलाब पाटील
रावेर (रविवार, 11 ऑक्टोबर 2026) : विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसीत होण्यासोबतच नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती मिळविण्यासाठी विज्ञान प्रदर्शन महत्त्वाचे माध्यम आहे. तालुकाभरातील विद्यार्थ्यांनी विविध वैज्ञानिक उपकरणे व नावीन्यपूर्ण प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून भविष्यातील तंत्रज्ञानाची झलक दाखविली आहे. विद्यार्थ्यांनी सादर केलेले प्रयोग आणि उपक्रम कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन पोदार स्कूल, रावेरचे अध्यक्ष डॉ.गुलाबराव पाटील यांनी येथे केले.
विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला मिळाले व्यासपीठ
रावेर शहरातील पोदार लर्न स्कूलमध्ये 54 व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन प्रसंगी ते बोलत होते. या प्रदर्शनात तालुक्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी विज्ञानाच्या विविध क्षेत्रांतील नावीन्यपूर्ण प्रकल्प व प्रात्यक्षिके सादर केली. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला आणि वैज्ञानिक विचारांना या प्रदर्शनातून व्यासपीठ मिळाले.
तीन प्रकल्पांची निवड
या प्रदर्शनातून मुख्यमंत्रीस्तरीय विज्ञान परिषदेसाठी तीन प्रात्यक्षिकांची निवड करण्यात आली तर सहा प्रात्यक्षिके सादर करणार्या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली. शिक्षकांनी सादर केलेल्या प्रात्यक्षिकांमधून तीन शिक्षकांची निवड करण्यात आली. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा व शिक्षकांचा मेडल आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
यांची होती उपस्थिती
पोदार स्कूल, रावेरचे अध्यक्ष डॉ.गुलाबराव पाटील, सचिव सुनीता कुलपल्ली, शिक्षणाधिकारी रवींद्र नव्हाळे, तांत्रिक अधिकारी व्ही.टी.केढे, शिक्षण विस्तार अधिकारी संगीता पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी साहेबराव शिंदे, केंद्रप्रमुख भूषण चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते. विज्ञान प्रदर्शन यशस्वीतेसाठी पोदार लर्न स्कूल, रावेरचे मुख्याध्यापक डॉ.जतीन हिंदुजा यांच्यासह शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी विशेष परिश्रम घेतले. रावेर तालुका विज्ञान अध्यापक मंडळाचे पदाधिकारी संदीप पाटील व सर्व पर्यवेक्षकांनी मोलाचे योगदान दिले.



