बाल संस्कार विद्यालयात शारदोत्सव : भव्य मिरवणुकीने यावलकरांचे लक्ष वेधले !
यावल (रविवार, 11 ऑक्टोबर 2026) : बाल संस्कार मंडळ एज्युकेशन सोसायटी, यावल संचलित बाल संस्कार बालवाडी, बाल संस्कार विद्या मंदिर व बाल संस्कार माध्यमिक विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 26 व्या शारदोत्सवाला रविवार, 11 ऑक्टोबर रोजी उत्साहात प्रारंभ झाला. सकाळी आठ वाजता श्रीहरी मोरेश्वर कवडीवाले यांच्या घरापासून श्री शारदा मातेच्या भव्य मिरवणुकीला सुरुवात झाली.
शहरात भक्तीमय वातावरण
ढोल-ताशांचा गजर आणि विविध पथकांच्या सहभागामुळे मिरवणुकीत उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरण निर्माण झाले. यात झांज, लेझीम, कळशी व दांडिया पथकांचा समावेश होता. शहराच्या मुख्य रस्त्यावरून मिरवणूक पाहण्यासाठी व बालकांचे कौतुक करण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. संस्थाध्यक्ष महेश वाणी व ज्योती वाणी यांच्याहस्ते सपत्नीक शारदा मातेची स्थापना करण्यात आली.
यशस्वीतेसाठी बालवाडी मुख्याध्यापिका अंजली कवडीवाले, प्राथमिक मुख्याध्यापक सुनील माळी, माध्यमिक मुख्याध्यापक अतुल गर्गे तसेच उत्सव प्रमुख सविता कमलाकर बारी, राजेंद्र गोपाळ फालक यांनी नियोजन केले. मिरवणुकीत विद्यार्थी प्रतिनिधी किंजल दीपक बडगुजर, गिरीश सुधाकर सोनार (बालवाडी), प्रतीक किशोर पाटील (चौथी) व चंचल राजेश भोईटे (चौथी) यांच्यासह विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. संस्थेचे सर्व संचालक मंडळ, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांच्या सहकार्याने उत्सवाचा प्रारंभ उत्साहात झाला. तीन दिवस विविध स्पर्धांचे व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.



