अखिल भारतीय ग्राहक संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विनोद गायकवाड यांचा भोपाळमधील अधिवेशनात गौरव


भुसावळ (रविवार, 11 ऑक्टोबर 2026) : भारत सरकारच्या विधी, न्याय आणि कंपनी व्यवहार मंत्रालयाद्वारे मान्यताप्राप्त अखिल भारतीय उपभोक्ता उत्थान संघटनेचे (ग्राहक संरक्षण) 26 वे राष्ट्रीय अधिवेशन मध्य प्रदेशातील भोपाळ येथील मानस भवनात 7 व 8 ऑक्टोबर 2026 रोजी झाले. या अधिवेशनात देशभरातील ग्राहक संरक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या पदाधिकार्‍यांचा गौरव करण्यात आला. त्यातील भुसावळ रहिवासी व अखिल भारतीय ग्राहक संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विनोद गायकवाड यांचाही सन्मान करण्यात आला.

विविध मान्यवरांची उपस्थिती
संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष हरिशंकर शुक्ल यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या दोन दिवसीय अधिवेशनाला मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती सुशील कुमार पालो प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. न्यायमूर्ती अंजली पालो आणि मध्य प्रदेश शासनाचे माजी मंत्री पी. सी. शर्मा यांची विशेष अतिथी म्हणून उपस्थिती होती. अधिवेशनाच्या दुसर्‍या दिवशीच्या कार्यक्रमाचे उद्घाटन मध्यप्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी मंत्री जितेंद्र ‘जीतू’ पटवारी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी आमदार रजनीश सिंह, माजी आमदार सुखेंद्र सिंह ‘बन्नाजी’, मध्य प्रदेश सेवा दलाचे मुख्य संघटक अवनीश भार्गव आणि संघटनेचे राष्ट्रीय सरचिटणीस बाळासाहेब पांडे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.


राष्ट्रीय पुरस्कारांसाठी निवड समिती
राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार निवडीसाठी ओम भारद्वाज यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय निवड समिती गठित करण्यात आली होती. या समितीत श्री. अजय चौधरी, श्री. चितरंजन पर्वत, श्री. राजेंद्र सिंह बसवाल आणि श्रीमती शिवाकामी एस. यांचा समावेश होता. समितीच्या माध्यमातून ग्राहक संरक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणार्‍या राज्यांना, प्रदेशाध्यक्षांना आणि महिला पदाधिकार्‍यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

तीन राज्यांना पुरस्कार
राज्यस्तरीय पुरस्कारांमध्ये छत्तीसगडला प्रथम, पंजाबला द्वितीय, तर तमिळनाडूला तृतीय क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. याशिवाय विविध राज्यांतील प्रदेशाध्यक्ष आणि पदाधिकार्‍यांचाही त्यांच्या कार्याबद्दल सन्मान करण्यात आला.

या प्रदेशाध्यक्षांचा सन्मान
पुरस्कारप्राप्त प्रदेशाध्यक्षांमध्ये मध्य प्रदेशचे संदीप सुरी, दिल्लीचे श्रीधर अय्यर, आंध्र प्रदेशचे कटरा गड्डा, तमिळनाडूचे डॉ. शिवकुमार, महाराष्ट्राचे प्रा.डॉ.विनोद गायकवाड, छत्तीसगडचे खुलेश वर्मा, केरळचे अब्दुल करीम खान, पंजाबचे बलबीर सिंह, कर्नाटकचे योगेश रेड्डी, हरियाणाचे देवेंद्र अत्री, झारखंडचे देवकुमार द्विवेदी, मुंबईचे विंचूरजी यांचा समावेश होता. महाराष्ट्रातील जळगावचे जिल्हा सचिव श्री. रवींद्र अहिरे यांना ‘बेस्ट परफॉर्मन्स’ (उत्कृष्ट कामगिरी) पुरस्काराने, तर नाशिकचे जिल्हाध्यक्ष श्री. दीपकजी भंगाळे यांना यंदाच्या ‘उत्कृष्ट पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले.

महिला पदाधिकार्‍यांचाही गौरव
ग्राहक संरक्षण क्षेत्रातील कार्याबद्दल महिला पदाधिकार्‍यांनाही पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये कटनी येथील श्रीमती प्रिती सेन यांना प्रथम, झारखंडच्या पुष्पा मिश्रा यांना द्वितीय, तर महाराष्ट्राच्या मंगला गरदे यांना तृतीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. या राष्ट्रीय अधिवेशनाच्या माध्यमातून ग्राहकांचे हक्क, ग्राहक संरक्षण आणि संघटनात्मक कार्यासाठी योगदान देणार्‍या पदाधिकार्‍यांच्या कार्याची दखल घेण्यात आली. महाराष्ट्रातील जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांतील पदाधिकार्‍यांना राष्ट्रीय स्तरावर मिळालेल्या पुरस्कारांमुळे जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !