10 हजारांची लाच भोवली : महिला पर्यवेक्षिका एसीबीच्या जाळ्यात
अंगणवाडी मदतनीसपदी नियुक्तीचा आदेश दिल्याच्या मोबदल्यात स्वीकारली लाच
नाशिक (मंगळवार, 20 ऑक्टोबर 2026) : अंगणवाडी मदतनीसपदी नियुक्तीचा काढून दिल्याच्या मोबदल्यात 20 हजारांच्या लाचेची मागणी करीत तडजोडीअंती दहा हजारांची लाच स्वीकारताना सुरगाणा तालुक्यातील महिला पर्यवेक्षिका हेमलता धवळू गाढवे (53, सुरगाणा गल्ली, शांतीनगर, ता.सुरगाणा, जि.नाशिक) यांना नाशिक एसीबीने अटक केली. या कारवाईने लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे.
असे आहे लाच प्रकरण
मूळ तक्रारदार यांची अंगणवाडी मदतनीस पदासाठी गुणवत्तेच्या आधारावर 30 सप्टेंबर 2026 रोजी निवड करण्यात आली होती. अंगणवाडी केंद्र शिराटा, ता.सुरगाणा येथे नियुक्तीचा आदेश प्राप्त झाल्यानंतर त्या कर्तव्यावर हजर झाल्या. अंगणवाडी केंद्र हे शिराटा हे माणी बीट अंतर्गत येत असल्याने तेथील बीट पर्यवेक्षिका हेमलता गाढवे यांनी तक्रारदाराकडे वरिष्ठांच्या नावाने 20 हजारांची लाच मागणी केली. तक्रारदाराला लाच द्यायची इच्छा नसल्याने त्यांनी नाशिक एसीबीकडे तक्रार दिल्यानंतर लाच पडताळणी करून सापळा रचण्यात आला.




10 हजारांची लाच स्वीकारताच अटक
एसीबीने पडताळणीदरम्यान संशयित पर्यवेक्षिका हेमलता गाढवे यांनी सुरुवातीला 20 हजार रुपयांची मागणी केल्याचे आणि त्यानंतर तडजोड करून 10 हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवल्याचे निष्पन्न झाल्यानंतर सापळा रचण्यात आला. सोमवार, 19 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी स्वीकारताच गाढवे यांना अटक करण्यात आली. सुरगाणा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
यांनी केला सापळा यशस्वी
ही कारवाई नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक सुरेश शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नेहा सूर्यवंशी, हवालदार विनोद चौधरी, अनिल गांगोडे, योगेश शिंदे, परशराम जाधव आदींच्या पथकाने केली.
तक्रारदारांविरोधात तक्रारी करण्याचे आवाहन
शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी शासकीय कामाच्या मोबदल्यात लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन नाशिक विभागाने केले आहे. नागरिकांना भ्रष्टाचारासंबंधी तक्रार करण्यासाठी 1064 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असेही एसीबीने कळवले आहे.
