ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर घ्याव्यात निवडणुका : भुसावळात संविधान बचाव समितीचे राष्ट्रपतींना निवेदन

एसआयआर प्रक्रिया रद्दची मागणी : ऐनवेळी मोर्चा रद्द


भुसावळ (शुक्रवार, 23 ऑक्टोबर 2026) : भारतीय लोकशाही, संविधानिक मूल्ये आणि निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता जपण्याच्या मागणीसाठी संविधान बचाव समिती, भुसावळ यांच्या वतीने राष्ट्रपतींच्या नावाने भुसावळ प्रांताधिकार्‍यांना शुक्रवार, 23 रोजी निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनातून केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासोबतच मतदार यादी पुनरीक्षणाची विशेष सखोल प्रक्रिया (एसआयआर) तत्काळ रद्द करावी आणि इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांऐवजी (ईव्हीएम) बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.

निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी
शुक्रवार, 23 ऑक्टोबर रोजी भुसावळ प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांना निवेदन देण्यात आले. भारतीय लोकशाही, संविधान आणि निवडणूक प्रक्रियेवरील जनतेचा विश्वास कायम राखण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी करण्यात आली. निवडणूक आयोगाने निष्पक्ष आणि पारदर्शकपणे काम करणे आवश्यक असताना, सध्याच्या निवडणूक प्रक्रियेबाबत नागरिकांमध्ये संशयाचे वातावरण निर्माण झाल्याचा दावा समितीनेकरीत नैतीक जबाबदारी स्वीकारून ज्ञानेश कुमार यांनी तात्काळ पदाचा राजीनामा द्यावा किंवा त्यांना पदावरून हटविण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

‘एसआयआर’ प्रक्रिया तत्काळ रद्द करावी
मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची (एसआयआर) प्रक्रिया रद्द करण्याची मागणीही निवेदनात करण्यात आली. या प्रक्रियेमुळे मतदारांच्या मनात संभ्रम निर्माण झाला असून मतदानाच्या अधिकाराबाबत अनिश्चितता वाढू शकते, अशी भूमिका समितीने मांडली आहे. मतदार यादीतील दुरुस्ती आणि पुनरीक्षण करताना नागरिकांच्या मतदानाच्या मूलभूत अधिकारांचे संरक्षण व्हावे तसेच कोणत्याही पात्र मतदारावर अन्याय होऊ नये, यासाठी ही प्रक्रिया तात्काळ थांबविण्याची मागणी करण्यात आली.

बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या
निवडणूक प्रक्रियेवरील जनतेचा विश्वास अधिक मजबूत करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांऐवजी बॅलेट पेपरच्या माध्यमातून निवडणुका घेण्याची मागणी संविधान बचाव समितीने केली आहे. ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यंत्रांच्या वापराबाबत नागरिकांमध्ये निर्माण झालेला संशय दूर करण्यासाठी पारंपरिक मतपत्रिकेचा पर्याय स्वीकारावा, असे निवेदनात नमूद करण्यात आले. मतदारांना मतदान प्रक्रियेबाबत विश्वास वाटावा आणि निवडणुकीच्या निकालांबाबत पारदर्शकता राहावी, यासाठी बॅलेट पेपर पद्धतीचा अवलंब करण्याची मागणी करण्यात आली आहे.

संविधानिक मूल्यांच्या संरक्षणासाठी पुढाकार
संविधान, समता, न्याय आणि बंधुता या मूल्यांच्या संरक्षणासाठी समितीने या निवेदनाच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. लोकशाही व्यवस्थेत निवडणूक आयोगाची भूमिका महत्त्वाची असल्याने निवडणूक प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक आणि विश्वासार्ह असावी, असे समितीचे म्हणणे आहे. निवेदनाच्या शेवटी राष्ट्रपतींनी या मागण्यांचा गांभीर्याने विचार करून योग्य ती कार्यवाही करावी, अशी विनंती करण्यात आली.

यांची होती उपस्थिती
संविधान बचाव समिती, भुसावळतर्फे सादर करण्यात आलेल्या निवेदनावर शेख फिरोज रहेमान, बाळा पवार, अहमद इब्राहीम कुरेशी, अनुप खोब्रागडे, रेहान जलील कुरेशी, सुधीर जंजाळे, जुनेर अशरफ खान, नमा शर्मा, शेख मुजाहिद, गणेश चौधरी, हाजी सलीम पिंजारी, रवींद्र निकम, अकबर अहमद शेख, प्रवीण सुरवाडे, शाकीर पिंजारी, गणेश सपकाळे, जावेद हामीद शेख, विजय साळवे, साजीद सलीम बागवान, मुन्ना सोनवणे, शेख रऊफ युसूफ आदींची नावे आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !