भुसावळ रेल्वे स्थानकावर अवैध वेंडिंगविरुद्ध अचानक मोहीम ; 17 अनधिकृत विक्रेत्यांवर कारवाई


भुसावळ (शनिवार, 24 ऑक्टोबर 2026) : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातर्फे भुसावळ रेल्वे स्थानकावर अनधिकृत वेंडिंगला आळा घालण्यासाठी अचानक तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत नियमांचे उल्लंघन करून खाद्यपदार्थ व इतर वस्तूंची विक्री करणार्‍या 17 अनधिकृत विक्रेत्यांविरुद्ध कारवाई करण्यात आली.

कारवाईने उडाली खळबळ
विभागीय रेल्वे व्यवस्थापक आणि वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सहायक वाणिज्य व्यवस्थापक (तिकीट तपासणी) यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात आली. यामध्ये वाणिज्य निरीक्षक, मुख्य तिकीट निरीक्षक आणि रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) कर्मचार्‍यांनी सहभाग घेतला.

नऊ विक्रेत्यांकडून 18 हजार 820 रुपयांचा दंड वसूल
तपासणीदरम्यान अनधिकृतपणे विक्री करणार्‍या नऊ विक्रेत्यांवर जनविश्वास अधिनियमातील तरतुदींनुसार कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून एकूण 18 हजार 820 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. याशिवाय अन्य 7 अनधिकृत विक्रेत्यांना पुढील कारवाईसाठी आरपीएफच्या ताब्यात देण्यात आले.

अधिकृत विक्रेत्यांकडूनच खरेदी करण्याचे आवाहन
रेल्वे स्थानक परिसरात प्रवाशांना सुरक्षित, स्वच्छ आणि सुव्यवस्थित वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाकडून अशा अचानक तपासणी मोहिमा राबविण्यात येत आहेत. अनधिकृत विक्रीवर नियंत्रण ठेवण्यासाठी भविष्यातही या मोहिमा सुरू राहणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले. प्रवाशांनी रेल्वे स्थानक परिसरात केवळ अधिकृत विक्रेत्यांकडूनच खाद्यपदार्थ आणि इतर वस्तू खरेदी कराव्यात. तसेच, अनधिकृत वेंडिंग आढळल्यास संबंधित रेल्वे अधिकार्‍यांना माहिती देऊन नियमांचे पालन करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातर्फे करण्यात आले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !