किनगाव दगडफेक प्रकरण : शंभराहून अधिक जणांविरुद्ध गुन्हा दाखल
16 जणांना पाच दिवसाची पोलीस कोठडी : गावात बंदोबस्त कायम
यावल (मंगळवार, 27 ऑक्टोबर 2026) : यावल तालुक्यातील किनगाव येथे विजयादशमीनिमित्ताने राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे पथसंचलन रविवारी आयोजित करण्यात आले. या पथसंचलनास एका धार्मिक स्थळासमोरून नेण्यात विरोधावरून पोलिसांवर करण्यात आलेल्या दगडफेकीत तब्बल 100 हुन अधिक जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यातील 16 जणांना अटक करण्यात आली होती. अटकेत असलेल्या सर्वांना सोमवारी यावल न्यायालयात हजर केले असता त्यांना 31 ऑक्टोंबरपर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. गावात चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला डीवायएसपी तळ ठोकून आहेत.
काय घडले किनगावात ?
किनगाव येथे चुंचाळे रोडवर एका धार्मिक स्थळासमोरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनास विरोध दर्शवतांना रस्त्या अडवण्यात आला होता. समुदायास बळाचा वापर करून रस्त्यावरून हटवतांना झालेल्या दगडफेकीत एका पोलीस उपनिरीक्षकासह सात जण जखमी झाले. या प्रकरणी यावल पोलीसस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक अनिल महाजन यांच्या फिर्यादीवरून 100 हुन अधिक जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. हारुण नसीर पिंजारी, अक्षय संतोष साळुंखे, भूषण शिवाजी साळुंखे, इरफान खान शेर खान, आजीम शेख कलीम, अल्ताफ कडषु पिंजारी, कलीम शकील पिंजारी, आसीफ मुस्ताक खाटीक, समीर खान शकील खान, वसीम खान अयूब खान,रियाज राजु तडवी, रिहान इकबाल फकीर, समीर खान युनुस खान,शेख जावीद शेख कलीम,इम्रान फारुख बागवान, रहीम शहा रमजान शहा फकीर या 16 जणांना अटक करण्यात आली.
आरोपींची कोठडीत रवानगी
आरोपींना सोमवारी यावल न्यायाधीश आर.एस.जगताप यांच्यासमोर हजर केले असता या सर्वांना 31 ऑक्टोंबरपर्यत पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक अजयकुमार वाढवे करीत आहे.
