भुसावळ तालुक्यातील दाम्पत्याचा शेतात विद्युत शॉक लागल्याने मृत्यू


भुसावळ (मंगळवार, 27 ऑक्टोबर 2026) : शेतात काम करताना विजेचा धक्का लागून शेतकरी दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी भुसावळ तालुक्यातील सुसरी शिवारात घडली. अशोक बाबूराव पाटील (55) आणि सरीता अशोक पाटील (43, रा.सुसरी, ता.भुसावळ) अशी मृतांची नावे आहेत.

कांद्याच्या शेतात निंदणीचे काम सुरू असताना खाली पडलेल्या विद्युत तारेशी संपर्क आल्याने ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, अशोक पाटील आणि त्यांच्या पत्नी सरिता पाटील हे सोमवारी नेहमीप्रमाणे मजुरांसह शेतात कामासाठी गेले होते. कांद्याच्या पिकात मोठ्या प्रमाणात तण वाढल्याने पती-पत्नी तण काढण्याचे काम करीत होते. अशोक पाटील यांचा शेतात खाली पडलेल्या विद्युत तारेशी संपर्क आल्याने त्यांना जोरदार विजेचा धक्का बसला व त्याचवेळी सरीता पाटील यांनाही विजेचा धक्का बसला.

दोघांनाही तातडीने वरणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे सुसरी परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. विद्युत तार नेमकी कोणत्या कारणाने खाली पडली, याबाबत तपासातून स्पष्टता येणार आहे.

अशोक पाटील आणि सरिता पाटील यांच्या मुलीचा साखरपुडा येत्या 1 नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आला होता. घरात मंगलकार्याची तयारी सुरू असल्याने कुटुंबात आनंदाचे वातावरण होते मात्र साखरपुड्यापूर्वीच काळाने घाला घातल्याने पाटील कुटुंबाचा आनंद क्षणात नाहीसा झाला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !