नंदुरबार शहरात भरदिवसा घरफोडी ; 48 तासात आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात

पोलिसांच्या सतर्क कारवाईचे कौतुक ; 20 लाख 58 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत


नंदुरबार (शनिवार, 7 नोव्हेंबर 2026) : नंदुरबार शहरात दिवसाढवळ्या घरफोडी करून तब्बल 15 लाख 35 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरणार्‍या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या 48 तासांत अटक केली. आरोपींकडून चोरीस गेलेल्या सोन्याच्या दागिन्यांसह एकूण 20 लाख 58 हजार 500 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. विशेष म्हणजे आरोपी चोरीचे सोने विक्रीसाठी जात असताना पोलिसांनी कारवाई केली.

भरदिवसा झाली होती घरफोडी
4 नोव्हेंबर 2026 रोजी सायंकाळी 4 ते 6.30 वाजेदरम्यान नंदुरबार शहरातील गणेश नगर परिसरात राहणार्‍या पुष्पा विनोदकुमार चिंतलागे यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. घरातील कपाटातून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 15 लाख 35 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. याप्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. समांतर तपासादरम्यान नंदुरबार गुन्हे शाखेचे निरीक्षक अभिषेक पाटील यांना या गुन्ह्यातील संशयीत चोरीचे दागिने विक्रीसाठी जाणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर सापळा रचण्यात आला.









सापळा रचून आरोपींना अटक
नंदुरबार शहर हद्दीतील जगतापवाडी चौफुली येथे नाकाबंदी लावण्यात आली व मध्यरात्री तीन वाजेच्या सुमारास होंडा सिटी कार (जी.जे.05 जे.बी.7788) आल्यानंतर संशयीताची विचारपूस केल्यानंतर त्यांनी आपली नावे आकाश भिका सोनार (27, ओम साई पार्क, होळ शिवार, नंदुरबार) व रोहित किशोर मोरे (21, वाठोडा, ता.शिरपूर ,ह.मु.शांती नगर, लिंबायत सुरत) सांगितले. चौकशीत आरोपींनी अन्य एका साथीदारासह नंदुरबार शहरातील घरफोडी केल्याची कबुली दिली.

14 लाख 48 हजारांचे दागिने जप्त
वाहनाच्या ग्लो बॉक्समध्ये 14 लाख 48 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आढळल्याने ते जप्त करण्यात आले तसेच सहा लाख रुपये किंमतीचे वाहन जप्त करण्यात आले. आरोपींसह मुद्देमाल नंदुरबार शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला.

यांनी केली कारवाई
ही कारवाई नंंदुरबार पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, अपर पोलीस अधीक्षक आशीत कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक महेश निकम, उपनिरीक्षक विकास गुंजाळ, पोलीस हवालदार दिनेश चित्ते, मुकेश तावडे, योगेश सोनार, मोहन ढमढेरे, अभय राजपूत, हेमंत बारी, मनोज महाजन, विनोद पाटील तसेच महिला पोलीस अंमलदार रोहिणी धनगर आदींच्या पथकाने केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !